ICC World Cup Trophy Launch : जमिनीपासून 1 लाख 12 हजार फूट उंचीवर लाँच करण्यात आली विश्वचषक ट्रॉफी, अंतराळात पहिल्यांदाच हे घडले


आयसीसी एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात होणार आहे. या विश्वचषकाच्या ट्रॉफीचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या ट्रॉफीचे लॉन्चिंग खूप वेगळे होते, कारण ते अंतराळात करण्यात आले होते. जमिनीपासून एक लाख 20 हजार फूट उंचीवर ही ट्रॉफी लाँच करण्यात आली होती. यानंतर, ती पुन्हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर परत आली, जे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. ट्रॉफीला जोडलेल्या स्ट्रॅटोस्फेरिक बलूनमुळे हे शक्य झाले.

यासह, अवकाशात सोडण्यात आलेली क्रीडाविश्वातील ही अशी पहिलीच ट्रॉफी ठरली. यादरम्यान ट्रॉफीचे काही अप्रतिम फोटोही पाहायला मिळाले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या लॉन्चिंगचा व्हिडिओ ट्विट केला आहे. आता ही ट्रॉफी दौऱ्यावर जाणार असून 18 देशांना भेट देणार आहे.


या दौऱ्यात ट्रॉफी कुवेत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बहारीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, फ्रान्स, इटली, अमेरिका आणि भारत या देशांना भेट देणार आहे. हा दौरा आतापर्यंतचा सर्वात मोठा दौरा असेल, ज्यामध्ये सुमारे 10 लाख चाहत्यांना ही ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. हा दौरा 27 जूनपासून सुरू होईल आणि सर्व देशांमधून फिरून ही ट्रॉफी 4 सप्टेंबरला भारतात परतेल.


2011 नंतर आता एकदिवसीय विश्वचषक भारतात आयोजित केला जात आहे. आयसीसीने अद्याप विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले नसले तरी, सोमवारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या स्पर्धेचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल, तर उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे खेळवले जातील. या विश्वचषकाचे सामने एकूण 12 शहरांमध्ये खेळवले जातील, ज्यात बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, धर्मशाला, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद, मुंबई, लखनौ, पुणे आणि तिरुअनंतपुरम या शहरांचा समावेश आहे.

2011 मध्ये भारताने आपल्याच घरी विश्वविजेतेपद पटकावले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हा विश्वचषक जिंकला होता, मात्र त्यानंतर भारत पुन्हा विश्वविजेता होऊ शकला नाही. यावेळी घरच्या मैदानावर खेळला जाणारा विश्वचषक जिंकून टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल.