VIDEO : साई सुदर्शनने TNPLमध्ये 450 च्या स्ट्राईक रेटने 10 चेंडूत ठोकले अर्धशतक


सामने बदलले, विरोधक बदलले. मैदानही बदलले. पण साई सुदर्शनच्या वादळी शैलीत काही फरक पडला नाही. सुदर्शन एकापाठोपाठ एक अर्धशतके झळकावत आहे. TNPL म्हणजेच तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये असेच काहीसे करताना त्याने अर्धशतकांची हॅट्ट्रिक केली आहे. या लीगमध्ये, त्याने आयपीएल 2023 मध्ये जिथे डाव सोडला होता, तिथून त्याने आपला खेळ सुरु केला आहे. एकंदरीत TNPL मध्ये कोणाच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत असेल, तर तो फक्त साई सुदर्शन आहे.

तामिळनाडू प्रीमियर लीगच्या चालू हंगामात आतापर्यंत साई सुदर्शनने केवळ 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी सारखीच आहे. मॅच बाय मॅच, तो नॉन-स्टॉप गोलंदाजांची पिसे काढत आहे. अहमदाबाद ते कोईम्बतूर, कोईम्बतूर ते दिंडीगुल, साई सुदर्शन सगळीकडे आपली छाप सोडलेली दिसत आहे.


21 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाचा ताजा धमाका 19 जूनच्या संध्याकाळी खेळलेल्या TNPL सामन्यात पाहायला मिळाला. हा सामना Lyca Kovai Kings आणि Chepauk Super Gilies यांच्यात होता. हा सामना कमी धावसंख्येचा होता, परंतु या कमी धावांच्या सामन्यात साई सुदर्शनने गेल्या तीन सामन्यांमध्ये जशी कामगिरी केली होती, तशीच कामगिरी येथे देखील केली.

चेपॉक सुपरच्या 127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, 3 ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनने कोवई किंग्जकडून नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने 43 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या, ज्यापैकी 46 धावा 450 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फक्त 10 चेंडूत चौकारांद्वारे केल्या.

डावखुरा फलंदाज साई सुदर्शनचे हे सलग चौथे टी-20 अर्धशतक ठरले. त्याचवेळी त्याने टीएनपीएलमध्ये सलग तिसरे अर्धशतक झळकावले. टीएनपीएलमध्ये साईने आतापर्यंत फक्त 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये त्याची अर्धशतके आहेत. याआधी त्याने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये अर्धशतक झळकावले होते.

साई सुदर्शनच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर कोवई किंग्जने चेपॉक सुपर विरुद्धचा सामना 21 चेंडू आणि 8 गडी राखून जिंकला.