Adipurush Controversy : चोहोबाजूंनी घेरलेल्या मनोज मुंतशीरने पोलिसांकडे मागितले संरक्षण


ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबाबत सध्या गदारोळ सुरू आहे. चित्रपटातील संवाद आणि दृश्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. या वादानंतर आपल्याला धोका असल्याचे मनोज मुंतशीर यांनी म्हटले आहे.

मनोज मुंतशीर यांच्या सुरक्षेच्या मागणीवर मुंबई पोलिसांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या पोलिस लेखकाच्या अर्जावर विचार करत असून त्यानंतर सुरक्षा पुरवण्याबाबत निर्णय घेतील.

आदिपुरुष रिलीज झाल्यापासून मनोज मुंतशीर चित्रपटाच्या संवादांसाठी सतत लक्ष्यावर आहेत. सोशल मीडियावर लोक त्याच्याविरोधात संताप व्यक्त करत आहेत. या चित्रपटाचे सर्व संवाद मनोजने लिहिले आहेत. मात्र, भावना दुखावल्याची बाब समोर आल्यानंतर मनोज मुंतशीर यांनी संवाद बदलल्याचे सांगितले आहे.

आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबत बराच गदारोळ सुरू आहे. एकीकडे हा चित्रपट कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडत असतानाच दुसरीकडे हा चित्रपट त्याच्या संवादांमुळे चर्चेत आहे. चित्रपटात असे काही संवाद आहेत जे चाहत्यांना आवडले नाहीत आणि ते काढून टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे. आता चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटातील न आवडलेले संवाद काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.


कपड़ा तेरे बाप का! तेल तेरे बाप का! जलेगी भी तेरे बाप की, तेरी बुआ का बगीचा है क्या जो हवा खाने चला आया, जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे उनकी लंका लगा देंगे, अशा डायलॉग्समुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. गदारोळ वाढत असल्याचे पाहून मनोज मुंतशीर यांनी स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, लवकरच चित्रपटातून वादग्रस्त संवाद काढून टाकले जातील.


दरम्यान नालासोपारा, पालघर, महाराष्ट्रातील एका थिएटरमध्ये रविवारी आदिपुरुष सुरू होता. यादरम्यान काही हिंदू संघटनांच्या लोकांनी सिनेमागृहात घुसून गोंधळ घातला. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती सनातनचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणताना दिसत आहे. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आम्ही आंदोलन करू, आम्ही आमचे गळे कापायला तयार आहोत, असे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. यावेळी बॉलिवूडच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

या चित्रपटाबाबत वाद सुरू असला तरी बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तो मोडत आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच जगभरात 340 कोटींचा व्यवसाय केला आहे. मात्र, या चित्रपटाची खरी कसोटी आजपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. वीकेंडनंतर त्याचा व्यवसाय कसा होतो हे पाहणे मनोरंजक असेल.