Ashes Series : जो रूट, जॉनी बेअरस्टोने पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला काढले झोडपून, इंग्लंडने उभारली मजबूत धावसंख्या


इंग्लंडने अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी बेसबॉल क्रिकेटची ओळख करून दिली आणि सांगितले की ते कोणत्याही परिस्थितीत आपली आक्रमकता मागे सोडणार नाहीत. एजबॅस्टन येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्याच दिवशी आठ गडी गमावून 393 धावांवर पहिला डाव घोषित केला. रुट 118 धावा करून नाबाद राहिला.

रूटशिवाय इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो यानेही या सामन्यात शानदार खेळी करत 78 चेंडूत 78 धावा केल्या. आपल्या नाबाद खेळीत 152 चेंडूंचा सामना करताना रुटने सात चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याचवेळी बेअरस्टोने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 14 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आठ आणि उस्मान ख्वाजा चार धावांवर खेळत आहे.

इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सने आधीच स्पष्ट केले होते की, जरी ती अॅशेस असली तरी त्याचा संघ बेसबॉल क्रिकेट खेळत राहील. इंग्लंडला पहिला धक्का लवकर बसला. बेन डकेट (12) एकूण 22 धावांवर बाद झाला. त्याला जोश हेजलवूडने अॅलेक्स कॅरीच्या हाती झेलबाद केले. यानंतरही इंग्लंडने आपली आक्रमकता कमी केली नाही. ऑली पोप (31) आणि जॅक क्रॉलीने संघाची धुरा सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. पोपला नॅथन लायनने आपला बळी बनवले.


क्रॉलीने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तो चांगली फलंदाजी करत होता. 27व्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्कॉट बोलँडने त्याला अॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले. क्रॉलीने 73 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. दरम्यान उपाहाराची घोषणा करण्यात आली.


दुसरे सत्रही इंग्लंडच्या नावावर होते. या सत्रात इंग्लंडने दोन गडी लवकर गमावले पण त्यानंतर रुट आणि बेअरस्टो यांनी शानदार भागीदारी करत संघाला सांभाळले. दुसऱ्या सत्रात इंग्लंडने हॅरी ब्रूक (32) आणि कर्णधार बेन स्टोक्स (1) यांच्या विकेट्स गमावल्या. ब्रुकला लायनने तर स्टोक्सला हेजलवूडने आपला बळी बनवले. पण त्यानंतर रुट आणि बेअरस्टो यांनी पुन्हा आपले पाय रोवले. दुसरे सत्र संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 240 धावा होती.

बेअरस्टो आणि रूट दोघेही वेगाने धावा करत होते. विशेषतः बेअरस्टोच्या फलंदाजीत आक्रमकता अधिक दिसून आली. या आक्रमकतेत मात्र त्याने आपली विकेट गमावली. बेअरस्टोने लायनच्या चेंडूवर बाहेर येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि कॅरीने त्याला यष्टीचित केले. मोईन अली (18) आणि स्टुअर्ट ब्रॉड (16) हेही लवकर बाद झाले. दरम्यान, रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमनला मागे सोडले. ब्रॅडमनची कसोटीत 29 शतके आहेत. काही वेळाने स्टोक्सने इंग्लंडचा डाव घोषित केला. रूटने या कालावधीत 77.63 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. अ‍ॅली रॉबिन्सनने रूटसह 17 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियन फिरकीपटू लायनने इंग्लिश फलंदाजांना सर्वाधिक त्रास दिला. त्याने चार फलंदाजांना आपले बळी बनवले. मात्र, लायननेही अधिक धावा दिल्या. लायनने 29 षटकांत 149 धावा दिल्या. त्याच्याशिवाय हेझलवूडने दोन बळी घेतले. बोलंड आणि कॅमेरून ग्रीनने प्रत्येकी एक विकेट घेतली.