MPL 2023 : पत्नीच्या नंबरची जर्सी घालून मैदानात उतरला ऋतुराज गायकवाड, 5 षटकारांच्या जोरावर ठोकल्या 64 धावा


लग्नानंतर मैदानात परतलेल्या ऋतुराज गायकवाडने बॅटने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या सामन्यात त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करत तुफानी अर्धशतक ठोकले. ही तुफानी खेळी त्याच्यासाठी खूप खास आहे, कारण लग्नानंतर तो पहिल्यांदाच मैदानात उतरला होता.

अलीकडेच, त्याच्या लग्नामुळे, त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातून माघार घेतली होती. त्यानंतर पुणेरी बाप्पाकडून तो कोल्हापूर टस्कर्सविरुद्ध मैदानात उतरला आणि त्यानंतर त्याने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 27 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार मारत 64 धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना टस्कर्स संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावा केल्या. अंकित बावणेने 57 चेंडूत 72 धावा केल्या. 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणेरी संघाची सुरुवात दमदार झाली. पवन शहा आणि गायकवाड यांच्यात 110 धावांची भागीदारी झाली. दोघांनी फिफ्टी ठोकले.

गायकवाडने अवघ्या 22 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. गायकवाडच्या रूपाने पुणेरी संघाला 110 धावांवर पहिला धक्का बसला. तो 64 धावा करून बाद झाला. यानंतर पवन शहा आणि सूरज शिंदे यांच्यात भागीदारी झाली. 142 धावांवर पुणेरीची दुसरी विकेट शहाच्या रूपाने पडली. यानंतर सुजर शिंदेने यशच्या साथीने पुणेरी संघाचा 14.1 षटकात 8 गडी राखून विजय मिळवला.

गायकवाडने आपल्या खेळीत चेंडू प्रेक्षकांपर्यंत नेला. त्याने 7 व्या षटकात सलग 2 षटकार ठोकले. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर गायकवाडने लाँग ऑफवर षटकार ठोकला. पुढच्या चेंडूवर त्याने लाँग ऑनवर चेंडू सीमापार नेला.

गायकवाड या सामन्यात पत्नीची 13 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरले होते. खरंतर त्याची पत्नी उत्कर्षा देखील एक क्रिकेटर आहे आणि तिचा जर्सी नंबर 13 आहे. त्याचवेळी ऋतुराज अनेकदा 31 क्रमांकाच्या जर्सीत दिसला होता, मात्र यावेळी तो 13 क्रमांकाची जर्सी परिधान करुन दिसला.