व्हिडिओ : विराट कोहली बनला राशिद खानचा फॅन, अप्रतिम कॅच पाहून केली अशी कमेंट


गुजरात टायटन्सने दिलेल्या 228 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जाएंट्ल केवळ 171 धावा करता आल्या आणि 56 धावांनी सामना गमावला. लखनौचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने, लीगमध्ये त्याच्या जागी क्विंटन डी कॉक प्रथमच दिसला. डी कॉकने काइल मेयर्सच्या साथीने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि या दोघांनी गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि पहिल्या विकेटसाठी 8.2 षटकांत 88 धावांची भागीदारी केली. दरम्यान, या सामन्यात राशिद खानने आश्चर्यकारक झेल टिपून चाहत्यांना नाचायला भाग पाडले. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर काइल मेयर्सचा झेल घेऊन या स्टार फिरकीपटूने सर्वांनाच चकित केले.

विराट कोहलीलाही राशिद खानचा हा झेल खूप आवडला आणि किंग कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर राशिद खानचे कौतुक केले आणि लिहिले की, “जगातील सर्वोत्तम कॅचपैकी एक”.


सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला. 228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संघ 20 षटकांत केवळ 171 धावा करू शकला आणि सामना गमावला. गुजरातकडून मोहित शर्माने 4 विकेट घेतल्या. दुसरीकडे लखनौकडून क्विंटन डी कॉकने 70 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, लखनौविरुद्ध गुजरात टायटन्सने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 227 धावा केल्या. या सामन्यात गुजरातच्या बाजूने जोरदार फलंदाजी झाली. प्रथम वृद्धीमान साहाने 81 धावा केल्या आणि नंतर शुभमन गिलनेही मागे न राहता 94 धावांची नाबाद खेळी खेळली. तर लखनौकडून मोहसीन खान आणि आवेश खान यांनी 1-1 विकेट घेतली.

चाहत्यांसाठी खास गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा दोन भाऊ एका सामन्यात दोन विरोधी संघांचे नेतृत्व करत होते. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आहे. त्याचवेळी केएल राहुलच्या दुखापतीनंतर लखनौ सुपर जायंट्सने कृणाल पांड्याला संघाचा कर्णधार बनवले होते. टी-20 क्रिकेटमधला हा तिसरा सामना होता, जेव्हा दोन भाऊ एका सामन्यात विरोधी संघांचे नेतृत्व करत होते. याआधी हसी बंधू माइक आणि डेव्हिड बिग बॅश लीगमध्ये कर्णधार म्हणून दोनदा आमनेसामने आले आहेत.