IPL 2023 : ऋषभ पंतसारख्या मृत्यूला हरवणाऱ्या खेळाडूने कमावले 27 कोटी, Video


गेल्या वर्षाच्या अखेरीस भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने मृत्यूवर मात केली होती. 2023 च्या स्वागतासाठी तो घरी जात असताना मध्यंतरी पंत याचा रस्ता अपघात झाला. या अपघातात त्याची कार जळून खाक झाली. तोही गंभीर जखमी झाला. या अपघातात पंत थोडक्यात बचावला. आता तो मैदानात परतण्याची वाट पाहत आहे. पंतप्रमाणेच आणखी एक खेळाडू आहे, ज्याने मृत्यूला हरवले. कार अपघातात तोही गंभीर जखमी झाला.

स्वत: निकोलस पूरनने मृत्यूला हरवण्यापासून ते मैदानात परतण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकेकाळी या अपघातामुळे पूरनची कारकीर्द जवळपास संपुष्टात आल्याचे बोलले जात होते, मात्र कॅरेबियन यष्टिरक्षक-फलंदाजाने मैदानात दमदार पुनरागमन करत अवघ्या 4 महिन्यांत 27 कोटींची कमाई केली.


2016 ची गोष्ट आहे. निकोलस पूरन याचा अपघात वयाच्या 19 व्या वर्षी प्रशिक्षणानंतर घरी जात असताना झाला. तो घराच्या अगदी जवळ पोहोचला होता, मात्र यादरम्यान एका कारला ओव्हरटेक केल्याने तो वाळूच्या ढिगाऱ्यावर आदळला आणि रस्त्यावर आला, त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या कारने त्याला धडक दिली. अपघातानंतर तो बराच वेळ व्हीलचेअरवर होता. त्याच्या पायाचे हाड मोडले होते. त्याला पुनरागमन करण्यासाठी सुमारे 18 महिने लागले. यानंतर त्याने मैदानावर जोरदार पुनरागमन केले आणि त्याची मागणी आयपीएलमध्येही पाहायला मिळाली.

आयपीएलच्या शेवटच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला 10.75 कोटींमध्ये खरेदी केले होते, म्हणजेच 2 महिन्यांत त्याला 10 कोटींहून अधिक पगार मिळाला होता. त्याच वेळी, या हंगामात त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटी रुपयांना खरेदी केले. म्हणजेच 2 महिन्यांत, यावेळी त्याला 16 कोटी पगार मिळणार आहे. जर आयपीएलच्या 15व्या आणि 16व्या सीझनचा एकत्रित विचार केला, तर एकूण 4 महिन्यांत त्याची कमाई 27 कोटींच्या जवळपास आहे. आता शुक्रवारी तो त्याच्या जुन्या फ्रेंचायझी हैदराबादविरुद्ध मैदानात उतरणार आहे.