टी-20 क्रिकेटमध्ये अनेकदा गोलंदाजांची धुलाई केली जाते, मात्र सेंच्युरियनमध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात तर हद्दच झाली. दुसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकात 258 धावा केल्या, तरीही या संघाचा पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 4 विकेट्स गमावून 7 चेंडूंपूर्वी हे लक्ष्य गाठले. या सामन्यात गोलंदाजांची अक्षरशः वाताहत झाली.
Video : T20 सामन्यात 517 धावांचा पाऊस, मारले 35 षटकार
सेंच्युरियन T20 मध्ये एकूण 13 गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि त्यापैकी 12 गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट प्रति षटकात 10 धावांपेक्षा जास्त होता. फक्त कागिसो रबाडा असा गोलंदाज होता, ज्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटकात 10 धावांपेक्षा कमी होता. मार्गो यान्सन आणि मगाला यांनी 4-4 षटकात 50 हून अधिक धावा दिल्या. या सामन्यात अनेक आश्चर्यकारक आकडे पाहायला मिळाले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने मिळून 517 धावा केल्या. हा पहिलाच T20 आहे ज्यात दोन्ही संघांनी मिळून 500 चा आकडा पार केला आहे. यापूर्वी 515 धावांचा विक्रम मुल्तान सुलतान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या नावावर होता, जो पीएसएलच्या या हंगामात बनला होता.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 35 षटकार मारले गेले. कोणत्याही T20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा हा विश्वविक्रम आहे. एवढेच नाही तर या सामन्यात एकूण 81 चौकार आणि षटकार मारले गेले. हा T20 क्रिकेटचा विक्रम आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने 102 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये संघाने 100 चा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 5.3 षटकांत 100 धावांचा टप्पा पार केला. फुल नेशन संघाचा हा विक्रम आहे.
क्विंटन डिकॉकने वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही खेळाडूचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे सर्वात जलद अर्धशतक आहे.
वेस्ट इंडिजचा संघ हा सामना हरला असला तरी त्याचा फलंदाज जॉन्सन चार्ल्सने अवघ्या 39 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला. वेस्ट इंडिजकडून सर्वात जलद T20 शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. डेव्हिड मिलर आणि रोहित शर्मा यांनी 35-35 चेंडूत टी-20 शतके ठोकली आहेत.