Video : विल्यमसनचा झंझावात, शतकांची हॅटट्रिक, विराट कोहलीला टाकले मागे


केन विल्यमसनचा झंझावात सुरूच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सलग तिसरे कसोटी शतक झळकावून हा विक्रम केला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने विल्यमसनच्या शतकाच्या जोरावर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. त्याने 76व्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून 171 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक झळकावले. यासह त्याने विराट कोहलीलाही मागे टाकले.

विल्यमसनच्या कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजार धावाही पूर्ण झाल्या आहेत. त्याची सरासरी 54 पेक्षा जास्त होती. फॅब 4 मध्ये 28 कसोटी शतके झळकावणारा तो दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. त्याने कोहलीला मागे सोडले. किवी फलंदाजाने 164 डावात ही कामगिरी केली, तर कोहलीने 183 डावांमध्ये 28 कसोटी शतके पूर्ण केली.


फॅब 4 मध्ये सर्वात वेगवान 28 शतके करण्याचा विक्रम स्टीव्ह स्मिथच्या नावावर आहे. त्याने हा पराक्रम केवळ 153 डावांत केला. विल्यमसनने आपल्या अप्रतिम खेळीदरम्यान 2 चेंडूत 2 षटकार ठोकले. यापूर्वी त्याने 15616 चेंडूत 19 षटकार ठोकले होते. म्हणजेच त्याने प्रत्येक 822 चेंडूत एक षटकार मारला, पण श्रीलंकेविरुद्धच्या या कसोटीत त्याने केवळ 2 चेंडूत 2 षटकार ठोकले.

विल्यमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या शतकापूर्वी त्याने शेवटच्या कसोटीत श्रीलंकेविरुद्ध नाबाद 121 धावांची खेळी केली होती, तर त्याआधी त्याने इंग्लंडविरुद्ध 132 धावांची खेळी केली होती. विल्यमसन हा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने 3 वेळा एकापेक्षा जास्त शतके झळकावली आहेत.