यंदा शेवटचा असेल 50 षटकांचा वनडे विश्वचषक, येणार आहे का क्रिकेटचा नवा फॉरमॅट ?


क्रिकेटमध्ये नवीन फॉरमॅट येणार आहे का? एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल होणार आहे का? आता एकदिवसीय सामने 40 षटकांचे होणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे सध्या अवघड आहे, पण या बदलांच्या चर्चा नक्कीच रंगू लागल्या आहेत. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे की, वनडे फॉरमॅट जिवंत ठेवण्यासाठी त्यात बदल करणे आवश्यक आहे. एकदिवसीय क्रिकेट आता 40-40 षटकांचे असावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. दिनेश कार्तिकनेही शास्त्रींच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

दिनेश कार्तिक म्हणाला की एकदिवसीय क्रिकेटचे आकर्षण हरवत चालले आहे आणि यंदाचा विश्वचषक शेवटच्या वेळी 50 षटकांचा असू शकतो. रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक असे का बोलत आहेत? हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे.

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, एकदिवसीय क्रिकेट वाचवायचे असेल तर भविष्यात ते 40-40 षटकांपर्यंत कमी केले पाहिजे. शास्त्री म्हणाले, मी हे सांगतोय कारण 1983 मध्ये जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकलो, तेव्हा सामने 60 षटकांचे असायचे, तेव्हा लोकांची आवड कमी झाली आणि त्याची षटके 50 षटकांची झाली. माझ्या मते ती 40 षटके करण्याची वेळ आली आहे. काळानुरूप बदल आवश्यक आहे.

दिनेश कार्तिकने रवी शास्त्रींचे बोलणे एक पाऊल पुढे नेले. ते म्हणाले की, लोकांना कसोटी क्रिकेट पाहायचे आहे, जे क्रिकेटचे सर्वोत्तम स्वरूप आहे. लोक मनोरंजनासाठी T20 पाहतात पण 50 षटकांचा खेळ कंटाळवाणा होऊ लागला आहे. लोकांना ते 7 तास बसून बघायचे नाही. त्यामुळे कदाचित भारतात होणारा विश्वचषक शेवटच्या वेळी 50 षटकांचा खेळवला जाईल, असे कार्तिकला वाटत आहे. आता रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक यांच्या शब्दात किती ताकद आहे आणि आयसीसी यावर काय विचार करते हे येणारा काळच सांगेल.