जेव्हा गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी आमनेसामने यायचे, तेव्हा वातावरण नेहमीच तापलेले असायचे. दोघेही मैदानावर अनेकदा भिडले आहेत, पण भारतीय फलंदाजाच्या चेंडूवर आफ्रिदीचे हृदय गंभीरसाठी वितळले आहे. खरं तर, लीजंड लीग क्रिकेट मास्टर्सचा सलामीचा सामना शाहिद आफ्रिदीच्या आशिया लायन्स आणि गंभीरच्या इंडिया महाराजा यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना आशिया संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा केल्या.
गौतम गंभीरच्या हेल्मेटवर धडकला चेंडू आणि कळवळला आफ्रिदी, व्हिडिओ
भारत लक्ष्याचा पाठलाग करत होता. 12व्या षटकात अब्दुल रझाकचा चेंडू गंभीरच्या हेल्मेटवर आदळला, तेव्हा गंभीर 43 धावा करून मैदानावर होता. चेंडू त्याच्या हेल्मेटसमोरच्या फ्रेमवर आदळला. त्यानंतर आफ्रिदी सर्व काही सोडून त्याच्याकडे गेला आणि त्याने गंभीरला त्याची तब्येत विचारली. आपण ठीक असल्याचे गंभीर म्हणाला.
'Big-hearted' Shahid Afridi inquires if Gautam Gambhir is ok after that blow ❤️#Cricket pic.twitter.com/EqEodDs52f
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) March 10, 2023
चेंडू लागल्यानंतर भारतीय फलंदाजाने 13व्या षटकात आफ्रिदीच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. 14व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गंभीरने रझाकच्या चेंडूवर 54 धावांवर आपली विकेट गमावली. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आशियाने दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताला 20 षटकात केवळ 156 धावा करता आल्या आणि 9 धावांनी पराभव पत्करावा लागला.
भारताकडून गौतम गंभीरने सर्वाधिक 54 धावा केल्या. त्याने 39 चेंडूत 54 धावा ठोकल्या होत्या. तर आशियाकडून मिसबाह-उल-हकने सर्वाधिक 73 धावा केल्या. मिसबाह हा सामनावीर ठरला. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. तर शाहिद आफ्रिदीला केवळ 12 धावा करता आल्या. गोलंदाजीतही तो फ्लॉप ठरला. त्याने 4 षटकात 35 धावा लुटल्या आणि त्याला एकही यश मिळू शकले नाही.