Video : टीम डेव्हिडकडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई, 6 चेंडूत कुटल्या 30 धावा


पीएसएल 2023 च्या 24 व्या सामन्यात मुलतान सुलतान्सचा संघ हरला असला तरी त्याचा फलंदाज टिम डेव्हिडने सर्वांची मने जिंकली. पाकिस्तान सुपर लीगच्या 8 व्या मोसमातील पहिला सामना खेळण्यासाठी आलेल्या टीम डेव्हिडने इस्लामाबाद युनायटेडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. टीम डेव्हिडने केवळ 27 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकार मारत 60 धावा केल्या. टीम डेव्हिडच्या फलंदाजीच्या जोरावर मुलतान सुल्तान्सच्या संघाने 205 धावांपर्यंत मजल मारली, तरीही शेवटी इस्लामाबादने हे लक्ष्य एक चेंडू आधी गाठले.

टीम डेव्हिडबद्दल सांगायचे तर या खेळाडूने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज रुमान रईसची अवस्था बिघडवली. रुमानच्या एका षटकात टीम डेव्हिडने सलग चार षटकार ठोकले, तर या षटकात या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 30 धावा लुटल्या. या षटकात रुमानला त्याने 4 षटकार आणि एक चौकार लगावला.


रुमान रईसने दोन षटकांत केवळ 13 धावा दिल्या आणि त्यानंतर इस्लामाबादचा कर्णधार शादाबने त्याला चेंडू दिला. पण त्याचा डाव फसला. कारण रुमानचा पहिला चेंडू वाईड होता. यानंतर शान मसूदने पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर एकच धाव घेतली. टीम डेव्हिड जेव्हा स्ट्राईकवर आला, तेव्हा त्याने अप्रतिम फटके खेळत रुमान रईसच्या चार चेंडूत चार षटकार ठोकले. टीम डेव्हिडच्या फटकेबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम डेव्हिडने अवघ्या 20 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तान सुपर लीगच्या या हंगामातील हे सर्वात जलद अर्धशतक देखील आहे. टीम डेव्हिडचा पीएसएल रेकॉर्ड अप्रतिम आहे. या खेळाडूने या लीगमध्ये 18 डावांमध्ये 43.16 च्या सरासरीने 518 धावा केल्या आहेत. टीम डेव्हिडचा स्ट्राइक रेट 186 आहे आणि त्याने 50 धावांच्या चारपेक्षा जास्त डाव खेळले आहेत.