अखेर DC ने केली कॅप्टनची घोषणा, 5 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूला मिळाली जबाबदारी


महिला प्रीमियर लीगच्या पाच संघांच्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारपूर्वी दिल्ली कॅपिटल्स वगळता इतर चार संघांनी कर्णधाराची घोषणा केली होती. लीग सुरू होण्याच्या दोन दिवस आधी दिल्लीनेही आपल्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. या संघाने ऑस्ट्रेलियाची T20 वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन मेग लॅनिंगकडे संघाची कमान सोपवली आहे.

मेग लॅनिंगवर दिल्लीने खूप पैसा खर्च केला होता. लिलावात तिच्यावर 1 कोटी 10 लाख रुपये खर्च करून तिला संघात सामील केले होते. लॅनिंग ही कर्णधारपदाच्या बाबतीत दिल्लीतील सर्वात अनुभवी आहे, अशा स्थितीत तिचे कर्णधारपद निश्चित झाल्याचे आधीच मानले जात होते. दिल्लीने आता अधिकृत घोषणाही केली आहे.

लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने मागील तीन टी-20 विश्वचषक जिंकले आहेत. याशिवाय 2022 मध्ये झालेला एकदिवसीय विश्वचषकही लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. याआधी तिने आणखी एक टी-20 विश्वचषक जिंकला आहे. 5 ICC ट्रॉफी जिंकणारी ती एकमेव कर्णधार आहे.

दिल्ली कॅपिटल्सनेही संघाच्या उपकर्णधाराची घोषणा केली आहे. त्यांनी ही जबाबदारी भारतीय स्फोटक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जवर दिली आहे. जेमिमाने यापूर्वी कधीही उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळलेली नाही. महिला प्रीमियर लीगमध्ये ती पहिल्यांदाच या भूमिकेत दिसणार आहे.

लॅनिंगशिवाय आणखी दोन संघांची कमान ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हाती आहे. यष्टिरक्षक फलंदाज अॅलिसा हिली ही यूपी वॉरियर्सची कर्णधार असून बेथ मुनीकडे गुजरातची कमान आहे. स्मृती मंधानाची आरसीबीच्या कर्णधारपदी तर हरमनप्रीत कौरची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.