उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर हरमनप्रीतची ऑस्ट्रेलियाला ‘वॉर्निंग’


भारतीय महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी करत टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. अखेरच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार झाला. खरं तर, आयर्लंडच्या डावाच्या 9व्या षटकात अचानक पाऊस आला आणि त्यानंतर खेळ सुरू होऊ शकला नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार आयरिश संघ 5 धावांनी मागे होता आणि त्यामुळे टीम इंडियाला विजयी घोषित करण्यात आले. या विजयानंतर स्मृती मंधाना हिने आपण उपांत्य फेरीसाठी सज्ज असल्याची गर्जना केली.

आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. गुरुवारी होणाऱ्या या सामन्यात भारताला 2020च्या टी-20 विश्वचषक फायनलचा बदला घेण्याची संधी असेल. गेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडले होते आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीतने पुढील सामन्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, टीम इंडिया खुलेपणाने क्रिकेट खेळणार आहे. हरमनप्रीत कौर म्हणाली, हा सामना आमच्यासाठी चांगला होता. मंधानाने धावा केल्या जे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा ती आम्हाला सुरुवात देते, तेव्हा आम्ही चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचतो.

हरमनप्रीत पुढे म्हणाली, उपांत्य फेरी गाठणे ही मोठी गोष्ट आहे. आम्ही खूप दिवसांपासून मेहनत करत आहोत. आम्हाला चांगले करायचे आहे. आम्ही 100 टक्के देणे अपेक्षित आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट खेळायला आवडते. दोन्ही संघांसाठी हा करा किंवा मरोचा सामना आहे. आम्हाला फक्त मुक्तपणे क्रिकेट खेळायचे आहे.

दरम्यान स्मृती मंधाना टीम इंडियावर धावांचा पाऊस पाडत आहे, पण कर्णधार हरमनप्रीतचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. भारतीय कर्णधाराला आतापर्यंत 4 सामन्यात 16.50 च्या सरासरीने केवळ 66 धावा करता आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही खेळाडू कशी कामगिरी करते हे पाहावे लागेल.