चेतेश्वर पुजाराला गार्ड ऑफ ऑनर, 3 खास लोकांसह पोहोचला मैदानावर, पहा व्हिडिओ


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी मैदानात उतरताच चेतेश्वर पुजाराने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. 100 कसोटी सामने खेळणारा तो 13वा भारतीय खेळाडू ठरला. पुजारा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कपिल देव, विराट कोहली यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. यावेळी सुनील गावस्कर यांनी पुजाराला खास कॅपही दिली. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पुजारा त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी विशेष कॅप घेण्यासाठी तीन खास लोकांसह मैदानावर पोहोचला.

यावेळी पुजारासोबत त्याचे पहिले प्रशिक्षक आणि वडील अरविंद पुजारा, त्याची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होते. विशेष कॅप मिळाल्यानंतर पुजाराने गावस्कर यांचे आभार मानले आणि तुमच्याकडून ही कॅप मिळणे हा सन्मान असल्याचे सांगितले. त्याला टीम इंडियाकडून गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.


गावस्कर यांच्याकडून कॅप मिळाल्यानंतर पुजारा पुढे म्हणाला की, तुमच्यासारखे दिग्गज मला प्रेरणा देतात. सुरुवातीच्या काळात मी भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहत असे, पण मी भारतासाठी 100 कसोटी खेळू असे कधीच वाटले नव्हते. माझ्या मते कसोटी क्रिकेट हा खेळाचा सर्वोत्तम प्रकार आहे.

पुजारा पुढे म्हणाला की, आयुष्य आणि कसोटी क्रिकेटमध्ये बरेच साम्य आहे. जर तुम्ही कठीण काळात लढू शकत असाल, तर तुम्ही नेहमी शीर्षस्थानी असाल. त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे कुटुंब आणि मित्रांचे आभार मानले. नाणेफेकीच्या वेळी, पुजाराच्या 100 व्या कसोटीवर, रोहित म्हणाला की पुजारा आणि त्याच्या कुटुंबासाठी ही मोठी संधी आहे. 100 कसोटी सामने सोपं नसलं तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मोठा पल्ला गाठला आहे.