WPL 2023 Schedule : गुजरात-मुंबईत पहिली टक्कर, 4 मार्चपासून सुरू होणार महिला आयपीएल


महिला प्रीमियर लीग (WPL) मधील खेळाडूंच्या पहिल्या ऐतिहासिक लिलावानंतर आता स्पर्धेच्या सुरुवातीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी सर्वच संघांचे चाहते उत्सुक असून त्यांची उत्सुकता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वाढवली आहे. खेळाडूंच्या लिलावाच्या एका दिवसानंतर, भारतीय बोर्डाने WPL च्या पहिल्या हंगामाचे वेळापत्रक देखील जारी केले आहे, जे 4 मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील संघर्षाने सुरू होईल.

सोमवार, 13 फेब्रुवारी रोजी, बीसीसीआयने मुंबईत खेळाडूंचा लिलाव केला, ज्यामध्ये लीगच्या पाच फ्रँचायझींनी 59.50 कोटी रुपये खर्च करून एकूण 87 खेळाडूंना खरेदी केले. भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना ही लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली, तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले.

पाच संघांच्या या स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेत अंतिम फेरीसह एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी 20 लीग सामने आणि 2 प्लेऑफ असतील, ज्यामध्ये अंतिम सामना होईल. अंतिम सामना 26 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. संपूर्ण स्पर्धा मुंबईतच आयोजित केली जाणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने, तर डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत. मोसमातील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.


त्याच वेळी, 5 मार्च रोजी, स्पर्धेतील पहिला दुहेरी हेडर होईल. म्हणजे एका दिवसात दोन सामने. या दिवशी पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ब्रेबॉर्न येथे होईल, तर संध्याकाळी सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होईल.

आयपीएल प्रमाणे ही स्पर्धा देखील दुहेरी राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवली जाईल. म्हणजेच प्रत्येक संघ इतर चार संघांसोबत दोन सामने खेळेल. म्हणजेच, अशा प्रकारे प्रत्येक संघ किमान 8-8 सामने खेळेल. लीग टप्प्यातील शेवटचा सामना 21 मार्च रोजी यूपी आणि दिल्ली यांच्यात होणार आहे. गुणतालिकेतील प्रथम क्रमांकाचा संघ थेट अंतिम फेरीत जाईल, तर 24 मार्च रोजी दुस-या आणि तिस-या स्थानावरील संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल.