WPL 2023 : संघांनंतर आता खेळाडूंवर लागणार बोली, या तारखेला होणार लिलाव!


बीसीसीआय या वर्षीपासून सुरू होणाऱ्या महिला आयपीएल (महिला प्रीमियर लीग) च्या तयारीत व्यस्त आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून याबाबतचे काम सुरू झाले होते आणि आता मंडळ पूर्ण तयारीला लागले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मीडिया हक्कांचा लिलाव करण्यात आला, तर काही दिवसांपूर्वी लीगमध्ये सहभागी होणाऱ्या संघांचीही घोषणा करण्यात आली. आता महिला प्रीमियर लीगच्या खेळाडूंच्या लिलावाची प्रतीक्षा आहे. भारतात पहिल्यांदाच महिला खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून देशात महिला आयपीएलची मागणी होती. अखेर, गेल्या वर्षी बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 2023 पासून महिला आयपीएल सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. आता संघ निश्चित झाले आहेत. कोणत्या संघाच्या जर्सीमध्ये कोणता सुपरस्टार दिसणार हे पाहावे लागेल.

बीसीसीआयने अद्याप महिला प्रीमियर लीगमधील खेळाडूंच्या लिलावाची कोणतीही तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, न्यूज 18 च्या बातमीनुसार हा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. 10 किंवा 11 फेब्रुवारीला देशाची राजधानी दिल्लीत बोर्ड लिलाव आयोजित करेल. भारताच्या स्टार खेळाडूंशिवाय अनेक मोठ्या परदेशी नावांचाही लिलावाच्या यादीत समावेश आहे. या लिलावात त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

लिलावात पाच फ्रँचायझी सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या संघांच्या लिलावात फ्रँचायझी आणि संघांची शहरे ठरली. लिलावानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले की, पाच संघांसाठी 4669.99 ची बोली लावण्यात आली. अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेडने अहमदाबाद संघासाठी 1289 कोटी रुपयांची बोली लावली, ज्यासह हा संघ लीगमधील सर्वात महागडा संघ ठरला. रिलायन्सची स्वतःची कंपनी इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने मुंबई संघासाठी 912.99 कोटी रुपये खर्च केले.

पुरुषांच्या आयपीएलमधील बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडनेही महिला प्रीमियर लीगमधील बंगळुरू संघ विकत घेतला ज्यासाठी त्यांनी 901 कोटी रुपयांची बोली लावली होती. जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने दिल्लीचा संघ 810 कोटी रुपयांना विकत घेतला, तर लखनऊ महिला संघाची मालकी कॅप्री ग्लोबल होल्डिंग्सकडे असेल. यासाठी त्यांनी 757 कोटी रुपये खर्च केले.