Women’s IPL : BCCI ने 4670 कोटींना विकले 5 संघ, अहमदाबादने लावली सर्वाधिक बोली


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महिला इंडियन प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. बोर्डाने बुधवार, 25 जानेवारी रोजी लीगच्या नवीन 5 फ्रँचायझींची घोषणा केली, ज्यामध्ये अहमदाबादच्या नावावर सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे. अदानी स्पोर्ट्सलाइनने अहमदाबादची फ्रेंचायझी 1289 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. पुरुषांच्या IPL च्या 7 फ्रँचायझींपैकी फक्त मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांना त्यात फ्रँचायझी मिळाली आहे. एकूणच या लिलावातून बीसीसीआयला 4669.99 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. याशिवाय, बोर्डाने लीगचे नाव देखील ठेवले आहे – वुमन प्रीमियर लीग (WPL).

या वर्षी मार्चमध्ये पहिल्यांदाच सुरू झालेल्या या नवीन स्पर्धेसाठी बीसीसीआयला अनेक कंपन्यांकडून बोली मिळाल्या होत्या, त्यानंतर बीसीसीआयने बुधवारी सर्वाधिक बोली लावणाऱ्या 5 फ्रँचायझींची नावे जाहीर केली. अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि लखनऊ या शहरांना या लिलावात फ्रेंचायझी मिळाली आहेत. या पाचही शहरांमध्ये आयपीएल फ्रँचायझी आधीच अस्तित्वात आहेत.


या लिलावात 10 पैकी 7 आयपीएल फ्रँचायझींनी भाग घेतला होता. केवळ चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या लिलावात सहभागी झाले नाहीत. उर्वरित 7 फ्रँचायझींपैकी फक्त दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूला यात यश मिळाले आहे. त्याचबरोबर यासह दोन नवीन कंपन्यांनी WPL मध्ये प्रवेश केला आहे.