ICC ODI Rankings : सिराज बनला जगातील अव्वल गोलंदाज, शमीला 11 स्थानांचा फायदा, तर टॉप-10 मध्ये शुभमन गिलही


आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत मोहम्मद सिराज हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. सिराजने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार गोलंदाजी केली आणि त्याचा त्याला एकदिवसीय क्रमवारीत फायदा झाला. सिराजशिवाय शमी आणि शुभमन गिल यांनाही एकदिवसीय क्रमवारीत उत्कृष्ट कामगिरीचा लाभ मिळाला आहे. सिराजने गेल्या वर्षभरात वनडेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. यानंतर ट्रेंट बोल्टला हटवून तो वनडेमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. 2019 मध्ये एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात करणारा सिराज या फॉरमॅटमध्ये भारतासाठी जास्त सामने खेळत नव्हता. फेब्रुवारी 2022 मध्ये तो भारताच्या एकदिवसीय संघात परतला. यानंतर त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर सिराजने 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37 विकेट घेतल्या आहेत. त्याने भारतासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. 28 वर्षीय सिराज प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्या नेतृत्वाखाली सिराजने अतिरिक्त प्रशिक्षण घेतले आणि त्याच्या खेळाच्या अनेक पैलूंवर काम केले. याचा लाभ त्याला मिळाला आहे.

सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत नऊ विकेट घेतल्या आणि सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही चार विकेट्स घेतल्या. यानंतर तो 729 रेटिंग गुणांसह वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. मात्र, तो दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडपेक्षा फक्त दोन रेटिंग गुणांनी पुढे आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही गोलंदाजांच्या क्रमवारीत 11 स्थानांची प्रगती करत 32व्या स्थानावर झेप घेतली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारताची मायदेशातील मालिका पूर्ण झाल्यानंतर फलंदाजांच्या क्रमवारीत बरेच बदल झाले आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत आघाडीवर आहे, पण आता तीन भारतीय खेळाडू टॉप-10 मध्ये सामील झाले आहेत. फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक आणि शतक झळकावल्यानंतर 20 स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराट कोहली सातव्या तर रोहित शर्मा आठव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेने आपल्या शानदार शतकी खेळीनंतर फलंदाजांच्या यादीत 13 स्थानांची सुधारणा केली असून तो 37व्या स्थानावर पोहोचला आहे. आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसी क्रमवारीतही स्थान मिळाले आहे. आयर्लंडचा युवा खेळाडू हॅरी टेक्टर 12 स्थानांनी वाढून 13व्या स्थानावर पोहोचला आहे, तर वेगवान गोलंदाज जोश लिटलने 27 स्थानांची प्रगती करत गोलंदाजांच्या यादीत 33व्या स्थानावर पोहोचले आहे.