उथप्पाची बॅट झाली अधिक धारदार, 12 चेंडूत ठोकल्या 52 धावा


गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रॉबिन उथप्पाने दुबईत खळबळ उडवून दिली. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि 12 चेंडूत अर्धशतकही झळकावले. मात्र, असे असूनही तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. उथप्पा सध्या दुबई कॅपिटल्सकडून आंतरराष्ट्रीय T20 लीग खेळत आहे. या लीगमध्ये त्याने आत्तापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामन्यात बॅटने धुमाकूळ घातला आहे. दुबईकडून खेळण्यापूर्वी त्याने मागील वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा सामना खेळला होता.

सीएसकेकडून खेळल्यानंतर उथप्पा आता थेट दुबईच्या मैदानावर उतरला आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्याने दाखवून दिले की त्याच्या बॅटची धार अजून कमी झालेली नाही. दुबई कॅपिटल्ससाठी पहिल्या सामन्यात त्याने 43 धावांची खेळी केली.


दुसऱ्या सामन्यातही त्याने आपला क्लास दाखवला आणि गल्फ जायंट्सविरुद्ध 46 चेंडूत 79 धावा केल्या. उथप्पाने केवळ 12 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र, या वेगवान खेळीनंतरही तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि दुबई कॅपिटल्सला 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात जायंट्सने 19 षटकांत 4 गडी गमावून 183 धावा केल्या. कॅपिटल्सकडून उथप्पाशिवाय कर्णधार रोव्हमन पॉवेलने 38 आणि सिकंदर रझाने नाबाद 30 धावा केल्या. तर कर्णधार जेम्स व्हिन्सने नाबाद 83 धावा केल्या आणि इरास्मसने 52 धावा ठोकून जायंट्स संघाला विजय मिळवून दिला.