रोनाल्डो ठरला सर्वाधिक मोबदला घेणारा फुटबॉल खेळाडू क्लब करारापोटी मोजणार तब्बल पाच हजार कोटी रुपये


पोर्तुगालचा स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वाधिक मोबदला घेणारा फुटबॉल खेळाडू ठरला आहे. त्याची करारातून होणारी कमाई अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता कर्णधार लिओनेल मेस्सी याच्यापेक्षा ५ पटींहून अधिक आहे.
रोनाल्डो आणि क्लब यांच्यातील करार जगातील सर्वात मोठ्या रकमेच्या करारांपैकी एक करार ठरणार आहे.

सौदी अरेबियातील अल नासेर क्लबने तब्बल ५ हजार कोटी रुपये मोजून रोनाल्डो याच्याबरोबर तीन वर्षांचा करार केला आहे. त्याला क्लबकडून खेळण्यासाठी दर वर्षी २० कोटी युरो मिळणार आहेत. मेस्सी याला पॅरीस सेंट जर्मेन क्लबकडून खेळण्यासाठी दर वर्षी साडे तीनशे कोटी रुपये मिळतात.

रोनाल्डो याच्याशी झालेला करार केवळ कलाबसाठीच महत्त्वाचा आहे असे नाही. तो येणाऱ्या पिढ्यांसाठीही महत्त्वाचा आहे. रोनाल्डोमुळे देशातील मुलामुलींना स्वतःला सर्वोत्तम घडविण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे क्लबच्या वतीने सांगण्यात आले. रोनाल्डो यानेही नव्या देशात, नव्या सहकाऱ्यांबरोबर खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे.