हार्दिक पंड्या स्वकष्टावर जगतो रॉयल लाईफ

टीम इंडिया आणि आयपीएल मध्ये सातत्याने उत्तम कामगिरी बजावून नाव कमावलेल्या हार्दिक पंड्याची निवड टी २० साठी टीम इंडिया कप्तान म्हणून झाली आहे. हा ऑलराउंडर खेळाडू आयपीएल गुजराथ टायटन्सचा सुद्धा कप्तान आहे. ३ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या श्रीलंका सिरीज टी २० साठी तो कप्तान म्हणून निवडला गेला आहे. मैदान आणि मैदानाबाहेर हार्दिकची लाईफस्टाईल एकदम वेगळी असून २०-२० मधून करियर सुरु केलेल्या हार्दिकने करोडोंची संपत्ती कमावली आहे आणि त्याचा तो पुरेपूर उपभोग घेतो.

लहानपणापासून खेळात रस असलेल्या हार्दिकने २०१५ मध्ये करियर सुरु केले आणि आजपर्यंत त्यात खंड पडलेला नाही. आयपीएल मध्ये जबरदस्त खेळ करून त्याने एक वर्षातच टीम इंडिया मध्ये स्थान मिळविले. २०१६ मध्ये त्याने टी २० आणि वनडे डेब्यू केला असून अतिशय मेहनत घेतली आहे. २०२२ मध्ये हार्दिकची एकूण संपत्ती ९१ कोटींवर गेली आहे. यातील बहुतेक कमाई आयपीएल, बीसीसीआय कडून मिळणारे पैसे व ब्रांड प्रमोशन मधून त्याला मिळतात. त्याचे मासिक उत्पन्न १.२ कोटी आहे.

गुजराथ मध्ये त्याने २०१६ मधेच एक डिझायनर घर खरेदी केले आहे. याशिवाय देशात अन्य ठिकाणी त्याच्या मालमत्ता आहेत. अनेक लग्झरी कार्स त्याच्या ताफ्यात आहेत. चार कोटींची लोम्बार्गिनी, ६.१५ कोटींची रोल्स रॉइस सह मर्सिडीज, ऑडी, रेंज रोव्हर अश्या अनेक कार्स त्याच्याकडे आहेत. महागड्या घड्याळांचा त्याला शौक आहे आणि त्याच्याकडे ५ कोटी रुपये किमतीचे एक घड्याळ आहे.