माहीच्या ‘जीवा’ला मिळाली मेस्सी कडून खास नाताळ भेट

आर्जेन्टिनाचा फुटबॉलर आणि फिफा वर्ल्ड कप विजेत्या आर्जेन्टिनाचा कप्तान लियोनेल मेस्सी याचे जगभरात करोडो चाहते आहेत. फिफा कप जिंकल्याने मेसीची लोकप्रियता सध्या गगनाला भिडली आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा टीम इंडियाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माही मेस्सीचा निस्सीम चाहता आहेच पण त्याची सात वर्षाची कन्या जीवा सुद्धा मेस्सीची चाहती आहे. तिला नाताळ गिफ्ट म्हणून मेस्सीने त्याची सही आणि संदेश असलेली अर्जेटीनाची जर्सी पाठवली असून त्यामुळे आनंदात असलेल्या जीवाचे फोटो आई साक्षीने जीवाच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत जर्सीवरची मेसीची सही दाखविताना आनंदाने फुलून आलेली जीवा दिसते आहे. या सोबत पाठविलेल्या मेसेज मध्ये मेस्सी लिहितो,’ पारा झिवा म्हणजे जीवासाठी ,लाईक फादर, लाईक डॉटर, कॉमन लव्ह, मेरी ख्रिसमस.’

माही सुद्धा फुटबॉलचा अतिशय चाहता आहे. शालेय जीवनात तो फुटबॉल खेळत होता आणि शाळेच्या टीमचा गोलकीपर होता. त्याचे गोलकीपिंग मधले कौशल्य पाहूनच टीम इंडियामध्ये त्याची विकेट कीपर म्हणून निवड केली गेली होती असे सांगतात.टीम इंडिया सराव करत असताना सुद्धा अनेकदा माहीला फुटबॉल खेळताना पाहिले गेले आहे. माहीने भारतासाठी वर्ल्ड कप जिंकला आहे आणि मेस्सीने आर्जेन्टिना साठी. भले त्यांचे खेळ वेगळे असले तरी देशाला वर्ल्ड कप जिंकून देणारे ही त्यांची ओळख समान आहे.