जगात जेथे पाहाल तेथे दिसतील भारतीय

भारत चीनला मागे सारून आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या बनण्याच्या तयारीत असतानाच जगातील बहुतेक देशात भारतीयांचे अस्तित्व असलेले जाणवू लागले आहे. अर्थात अन्य देशात जाऊन स्थिरावण्याचा भारतीयांचा हा प्रवास गेली २०० वर्षे सुरु आहे. इतिहासाच्या नोंदी तपासल्या तर असे दिसते की इंडोनेशियाच्या बाली मध्ये दक्षिण भारतातून पाचव्या शतकापासून भारतीयांचे येणे जाणे आहे. १८ व्या शतकापासून व्यापार, नोकरी, अन्य व्यवसायानिमित्ताने भारतीय मोठ्या प्रमाणावर विदेशात गेले आहेत.

जेथे भारतीय सर्वाधिक संखेने आहेत अशा देशात पहिला क्रमांक अर्थातच अमेरिकाचा असून डिसेंबर २०१८ च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत ४४ लाखाहून अधिक भारतीय स्थायिक झाले आहेत. दोन नंबरवर युएई असून येथे ३१.०५ लाख भारतीय आहेत. त्यानंतर अनुक्रमे मलेशिया २९.९ लाख, सौदी २८.२० लाख, म्यानमार २०.८ लाख, युके १८.३० लाख , श्रीलंका १६.१ लाख, दक्षिण आफ्रिका १५.६ लाख, कॅनडा १०.१६ लाख  आणि कुवेत ९.३० लाख या देशांचा नंबर आहे.

गेल्या तीन वर्षात ३.९२ लाख भारतीयांनी १२० देशात आपले मुक्काम टाकले आहेत. त्यात अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे १,७०,७९५ जणांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. लोकसभेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इटली, जर्मनी, स्वीडन, सिंगापूर मध्येही अनेक भारतीय या काळात स्थायिक झाले आहेत. अगदी पाकिस्तान मध्ये सुद्धा ४८ भारतीय कायमचे रहिवासी झाले आहेत.