ब्रिटन मध्ये करोनाची पाचवी लाट, पण जाहीर केला जाणार नाही डेटा

नववर्षाचे आगमन होत असतानाच ब्रिटन मध्ये पुन्हा कोविड साथीने धोक्याची घंटा वाजविली असून ब्रिटन मध्ये करोनाची पाचवी लाट आली आहे. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने जानेवारी २०२३ पासून करोनाच्या रोजच्या केसेसची संख्या किंवा डेटा जाहीर केला जाणार नाही अशी घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार करोना आता सर्वसामान्य आजार झाला असून नागरिक रोजच करोना सोबत जगत आहेत. त्यामुळे करोनाला सिझनल फ्ल्यू मानले जाणार आहे. अर्थात त्यावर बारीक लक्ष ठेवले जाईल पण डेटा जाहीर केला जाणार नाही.

१७ ते २३ डिसेंबर या काळात ब्रिटनमध्ये ४० हजार नवे करोना संक्रमित सापडले आहेत आणि २८३ मृत्यू झाले आहेत. मात्र २२ आणि २३ डिसेंबरला एकही मृत्यू झालेला नाही. युरोप मधील ज्या १५ देशात करोना संक्रमण वेगाने वाढते आहे त्यात ब्रिटनचा समावेश आहे.

करोना उद्रेक झालेल्या चीन मध्यें औषधांचा तुटवडा असून सरकार व्हायरल इन्फेक्शन साठी दिली जाणारी पारंपारिक चीनी औषधेच नागरिकांनी घ्यावीत असे आवाहन करत आहे. चीन मध्ये करोना फ्ल्यू मानला जात आहे. जपान मध्ये करोनाची आठवी लाट आली आहे. चोवीस तासात १,४९ हजार नवे संक्रमित सापडले आहेत आणि ३०६ मृत्यू झाले आहेत. द. कोरियात २४ तासात ५८४४८ तर तैवान मध्ये १७७२८ नवे रुग्ण सापडले आहेत.