या देशाने ‘करोना’ला एकदाही दिली नाही एन्ट्री

जगाला गेली तीन वर्षे वेठीला धरलेल्या कोविड १९ने पुन्हा एकदा जगप्रवास सुरु केला आहे. चीन पासून सुरवात करून आता पुन्हा चीन, जपान, हॉंगकॉंग, अमेरिकेच्या प्रवासावर निघालेल्या करोनाला एका देशाने मात्र अजिबात एन्ट्री दिलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीतील १९६ देशात अशी कामगिरी करणारा हा एकमेव देश ठरला असून त्याचे नाव आहे तुर्कमेनिस्तान. आशिया खंडातला हा देश जगभर लॉकडाऊन आणि लाखोंच्या संखेने संक्रमित असताना करोना मुक्त राहिला आहे.

काही छोट्या छोट्या पॅसिफिक क्षेत्रातील देश सुद्धा करोना पासून दूर होते मात्र तेथेही  फेब्रुवारी २०२२ मध्ये काही करोना संक्रमित सापडले. तुर्कमेनिस्तान १९९१ पर्यंत सोव्हिएत संघाचा घटक होता. या फारसी शब्दाचा अर्थ तुर्कांची भूमी असा आहे. देशाची राजधानी अश्काबाद आहे. २०२० मध्ये जेव्हा चीनबाहेर प्रथम करोना फैलावू लागला तेव्हाच या देशाने विमानसेवा स्थगित केली आणि चीन बँकॉक मधील आपले नागरिक खासगी विमानाने परत देशात आणले. देशात करोना हे नाव घ्यायला सुद्धा बंदी केली गेली. तेव्हा सरकारने मिडियाला सुद्धा करोना बातम्या देण्यास बंदी घातली होती.

२९ फेब्रुवारीला या देशाने सर्व देशांना प्रवेश बंदी लागू केली.५ मार्च रोजी देशाच्या भेटीवर आलेल्या तीन विदेशी राजदूतांना सुद्धा देशात प्रवेश दिला गेला नाही. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बाहेरच्या बाहेर वळविली गेली. प्रवासी चेकिंग सुरु करून कुणाला करोना लक्षणे दिसलीच तर देशाबाहेर रुग्णालयात त्यांना ठेवले गेले.

काही काळानंतर करोना प्रभाव कमी झाल्यावर बाहेरच्या नागरिकांना करोना प्रमाणपत्र दाखविल्यावरच प्रवेश दिला गेला. एका शहरातून दुसर्या शहरात जाणाऱ्याच्या चाचण्या देल्या गेल्या. वास्तविक या देशाला नरकाचा दरवाजा म्हणतात. काराकुम भागात असलेल्या एका दरवाजा नावाच्या खड्ड्यात ५० वर्षे आग भडकलेली आहे. मिथेन वायुमुळे ही आग आहे. या देशाची लोकसंख्या ५६ लाख असून व्हिसा नियम अतिशय कडक आहेत. पर्यटनाला फारसे प्रोत्साहन नाही. त्यामुळे या देशाने करोना पासून दुरी सांभाळण्यात यश मिळविले आहे.