करोना साठी राज्य सज्ज, टास्क फोर्स स्थापणार- देवेंद्र फडणवीस

भारतात चीन मध्ये दहशत माजविलेल्या ओमिक्रोन करोना व्हेरीयंट बीएफ .७ चे तीन रुग्ण मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकार त्या संदर्भात सावध पावले उचलत आहे आणि लवकरच राज्यातील करोना परिस्थितीवर देखरेख करण्यासठी टास्क फोर्सची स्थापना करत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. बुधवारी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चीन मधील करोना स्थितीचा संदर्भ देत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.

चीन सह अनेक देशात पुन्हा एकदा करोनाचे संकट घोंघावू लागले आहे. मात्र भारत सरकार त्याबाबत जागरूक आहे. सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना त्या संदर्भाने सावधगिरीच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आहेत. त्यानुसार आम्ही केंद्राशी सल्ला मसलत करून योग्य निर्णय घेत आहोत आणि केंद्राच्या सूचना अमलात आणत आहोत असे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही बुधवारी राज्य सचिवांची बैठक घेऊन नवीन व्हेरीयंट वर लक्ष ठेवण्याच्या आणि करोना रुग्ण सापडला तर त्याच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग करून घेण्यास सांगितले आहे. यामुळे नवीन व्हेरीयंटवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने उपाय योजना करणे शक्य होणार आहे.