आर्यन खानने केली डेब्यू प्रोजेक्टची घोषणा

दीर्घ काळ बॉलीवूड डेब्यू करणार अश्या बातम्या येऊन गेल्यावर आता किंग खान पुत्र आर्यन खान याने सोशल मिडियावर पोस्ट करून त्याच्या पहिल्या वहिल्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. त्यावरून आर्यन अभिनय क्षेत्रात नव्हे तर दिग्दर्शनात उतरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्यन दिग्दर्शक म्हणून त्याच्या करियरची सुरवात करत आहे. ६ डिसेंबरच्या या पोस्ट मध्ये आर्यन म्हणतो,’ लेखन काम पूर्ण झाले आहे. आता शुटींग सुरु करण्याची अधिक वाट पाहू शकत नाही. लवकरच रेड चिली प्रोडक्शन खाली शुटींग सुरु करणार.’

आर्यन दिग्दर्शन करणार तो चित्रपट आहे का वेब सिरीज हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याने नेहमीच दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्या संदर्भातच त्याने प्रशिक्षण घेतले आहे. आर्यनच्या पोस्ट वर खूप कॉमेंट आल्या आहेत. सर्वात पहिली कॉमेंट गौरी खानने केली असून गौरी म्हणते,’ तुझे काम पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.’ शाहरुख म्हणतो,’ वा! विचार करतोयस? विश्वास करतोयस? स्वप्न पूर्ण कर. हिम्मत दाखव. माझे आशीर्वाद तुझ्यामागे आहेत. पहिला प्रोजेक्ट नेहमीच स्पेशल असतो.’

बॉलीवूड मधील शनाया कपूर पासून महिप कपूर पर्यंत अनेकांनी आर्यनच्या पोस्ट वर कॉमेंट केल्या आहेत.