भारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान, युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारताला ड्रोन हब बनविण्यासाठी मोदी सरकारने वेगाने हालचाली सुरु केल्या असल्याचे आणि ड्रोन क्षेत्रात दरवर्षी किमान १ लाख ड्रोन पायलट आणि ६ हजार कोटी रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे. ड्रोन क्षेत्र रोजगार संधी या विषयावरील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठाकूर म्हणाले, युवकांना योग्य कौशल्य प्रशिक्षण दिले जात असून त्यामुळे भारत जागतिक ड्रोन हब बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये किमान १ लाख ड्रोन पायलटची गरज लागू शकते. प्रत्येक ड्रोन पायलट आज महिना किमान ५० ते ८० हजारांची कमाई करतो आहे. १ लाख ड्रोन पायलट महिना ५० हजार पगारावर काम करू लागले तरी वर्षाला ६ हजार कोटींचे रोजगार निर्माण होऊ शकणार आहे. ड्रोन हे आजचे स्मार्ट टूल आहे. शेती, आरोग्य, वाहतूक, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन, मनोरंजन अश्या अनेक क्षेत्रात ड्रोन आवश्यक बनत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा भाग म्हणून ड्रोन ओळखली जात आहेत. भारतात ड्रोन हब बनण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती वेगाने निर्माण होत आहे आणि पीएलआयसारख्या योजना त्यात मदतगार बनल्या आहेत.

नवा ड्रोन नियम २०२१, ड्रोन सुटे भाग निर्मितीसाठी पीएलआय प्रोत्साहन आणि स्वदेशी ड्रोन मागणी निर्माण करणे ही निती अतिशय योग्य ठरली असून केंद्र सरकारची १२ मंत्रालये त्यासाठी काम करत आहेत.