‘मुल्ला जनरल’ नावाने ओळखले जाणारे पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख असीम मुनीर

पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख म्हणून शहाबाज सरकारने असीम मुनीर यांची नेमणूक कमर जावेद बाजवा यांच्या जागी केली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी बुशारा यांचे भ्रष्टाचार प्रकरण याच असीम मुनीर यांनी उघडकीस आणले होते. ले.जनरल असीम मुशीर यांची ओळख मुल्ला जनरल या नावाने आहे. त्यांच्या नियुक्तीने इस्लाम कट्टरवादाला खतपाणी घातले जाणार आणि त्यामुळे भारताने सावध राहिले पाहिजे असा इशारा या क्षेत्रातील जाणकार तज्ञ देत आहेत.

जनरल असीम यांना इस्लामचा पवित्र कुराण ग्रंथ तोंडपाठ आहे. म्हणूनच त्यांना मुल्ला जनरल म्हटले जाते. अर्थात पाकिस्तान मध्ये अनेक असे मुस्लीम मुल्ला आहेत ज्यांना कुराण पाठ आहे. पण त्यातील कुणी लष्कर प्रमुख पदावर आलेला नाही. मुळात पाकिस्तानची फाळणी इस्लाम याच पायावर झाली असली तरी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांना देशात लोकशाही हवी होती मात्र तसे होऊ शकले नाही.

असीम मुनीर हे कट्टर इस्लामपंथी आहेत आणि पाकिस्तानी लष्करात अनेक सैनिक तबलगी जमातीशी संबध असलेले आहेत. पाकिस्तानी सेंना स्वतःला इस्लामी सेना मानते आणि लढायचे ते देशासाठी नाही तर अल्ला साठी हाच त्यांचा मोटो आहे. पाकिस्तान सध्या दहशतवादाची फॅक्टरी बनला आहे. जनरल झिया उल हक यांनी सर्वप्रथम इस्लाम कट्टरवादाला खतपाणी घातले असून कुराणवर आधारित युद्ध प्रशिक्षण सैनिकांना दिले जाते. असीम मुनीर यांनी सेनेत विविध पदावर काम केले असून २०१८-१९ या काळात ते पाकिस्तानच्या आयएसआयचे डीजी होते. यामुळे भारताविरुध्द ते कोणत्याही थराला जाऊ शकतात असा इशारा दिला जात आहे.