बनारस मध्ये या आहेत भूताटकीच्या जागा

बनारस, वाराणसी, काशी अश्या अनेक नावानी जगभर ओळख असलेले भारतातील प्रसिद्ध स्थळ अतिशय पवित्र मानले जाते. पवित्र गंगा मैया, काशी विश्वनाथ मंदिर, काळभैरव मंदिर, अन्य शेकडो मंदिरे आणि गंगेवरील अनेक घाट भाविकांच्या गर्दीने सतत फुललेले दिसतात. या नगरीला रोज लाखो लोक भेट देतात. पण या पवित्र ठिकाणी सुद्धा अश्या काही जागा आहेत जेथे भुते आहेत असे मानले जाते. म्हणजे या जागा पछाडलेल्या आहेत. त्यामुळे सहसा एकटा दुकटा कुणी या ठिकाणांना भेट देत नाही. रात्री तर नाहीच नाही.

या शहरात गंगेवर अनेक पूल आहेत. पण राजघाट पुलाबाबत अनेक भीतीदायक कथा सांगितल्या जातात. अर्ध्या रात्री या पुलावरून प्राणी धावतो आणि पाहता पाहता माणसाचे रूप घेतो अशीही कथा सांगितली जाते. गंगेवर येथे अनेक घाट आहेत. पैकी मनकर्णिका घाट अंतिम संस्कार करण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे रात्री आत्मे वावरतात असा समज आहे. त्यामुळे रात्री या घाटावर सहसा कुणी जात नाही.

बनारस हिंदू विद्यापीठ हे या शहराची शान असून हे विद्यापीठ जगात प्रसिद्ध आहे. पण येथील मेडिकल सेंटर बाबत मात्र फारसे कुणी बोलत नाही. या सेंटर बाबत अनेक भीतीदायक कथा सांगितल्या जातात. रात्री दोन आत्मे येथे पहारा करतात आणि किंकाळ्या फोडल्याचे आवाज अनेक वेळा येतात. याच शहरात १८व्या शतकातील चेतसिंग किल्ला आहे. सूर्य मावळला कि येथून गोड आवाज येतात. कुणी ओरडले कि हे आवाज बंद होतात. किल्याच्या राखणदाराच्या आत्मा येथे फिरतो असे सांगतात. या किल्ल्यात अनेक भुयारे आहेत आणि पूर्वी त्यात अनेक मृतदेह फेकले गेले होते असेही सांगितले जाते.