भारतात लागला होता बटणाचा शोध

शर्ट, पँट, फ्रॉक, ब्लाऊज, ड्रेस असा कुठलाही कपडा असो त्याला बटणे लावलेली असतात. आता काही कपड्यांना हुक किंवा चेन लावल्या जातात पण बटणे लावलेले अनेक प्रकार आजही उपलब्ध आहेतच. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण बटणाचा शोध लावण्याचे श्रेय भारताकडे आहे. जेव्हा भारतात बटणे वापरली जात होती तेव्हा जगात कुठेच वापरली जात नव्हती. बटनांचा शोध इसवी पूर्व २००० काळात लागल्याचे सांगितले जाते. सिंधू संस्कृती मध्ये त्याचा उल्लेख आहे. मोहोन्जादोरो उत्खननात त्याचे पुरावे सापडतात.

हडप्पावासी दागिना म्हणून अशी बटणे वापरत असत. दगड, धातू आणि लाकडापासून ती बनविली जात. मात्र त्यांचा आकार गोल नव्हता तर ती भौमितिक आकारात होती. १३ व्या शतकात प्रथम व्यापारी पातळीवर जर्मनी मध्ये बटणे विकसित केली गेली. त्याला धागा ओवण्यासाठी छिद्र होते. १४ व्या शतकाच्या प्रारंभी पूर्ण युरोप मध्ये त्याचा प्रसार झाला.

आज लोखंड, प्लास्टिक, लाकूड आणि अनेक मौल्यवान धातूंपासून बटणे बनतात. चीनच्या झेजियांग परगण्यातील कियोतू शहरात जगात वापरल्या जाणाऱ्या बटनांपैकी ६० टक्के बटणे बनतात. वर्षात १५ अब्ज बटणे येथे तयार होतात. प्रामुख्याने गोल बटणे अधिक संख्येने बनतात कारण वापरायला ती सोयीची ठरतात. जगात सर्वाधिक वापर असलेल्या ज्या वस्तू आहेत त्यात बटणाचा नंबर ७७६ वा आहे.

२०१९च्या जागतिक रिपोर्ट नुसार बटणाचा शोध भारतात लागला असला तरी बटणे आयात करणाऱ्या देशात भारत चार नंबरचा देश आहे. चीन, हॉंगकॉंग, इटली, जपान, जर्मनी देशात बटणे उत्पादन होते आणि येथूनच बटणे निर्यात होतात.