सोलापूर मध्ये नांदते आहे ७२ सदस्य असलेले एकत्र कुटुंब

काही काळापूर्वी भारताची शान मानली जाणारी भली मोठी कुटुंबे आता फारशी कुठे दिसत नाहीत. भारताची कुटुंबव्यवस्था जगात आदर्श मानली जाते आणि त्याचा पाया म्हणजे येथील एकत्र कुटुंब पद्धती. पण काळ पुढे गेला, परिस्थिती बदलली, शिक्षण, नोकऱ्या निमित्ताने घरातील तरुण पिढी शहरात गेली आणि तेथेच घरे करून राहू लागल्यावर एकत्र कुटुंबे मोडकळीला आली. पण महाराष्ट्राच्या सोलापूर शहरातील डोईजोडे कुटुंब मात्र याला अपवाद आहे. मूळचे कर्नाटकातील पण गेली १०० वर्षे सोलापुरात स्थायिक असलेल्या या कुटुंबात ७२ सदस्य असून सर्व एकाच छपराखाली गुण्या गोविंदाने नांदत आहेत.

घरातील कर्ते सांगतात आजी आजोबा, काका काकू, मुले, नातवंडे असे सर्व येथे राहतात. इतक्या मोठ्या कुटुंबाला रोज किमान १२०० रुपयांचा भाजीपाला, १० लिटर दूथ लागते आणि एक वेळचा स्वयंपाक रांधायचा तरी एकावेळी किमान पाच ते सहा चुली पेटवाव्या लागतात. या घरात चार पिढ्या एकत्र आहेत. या परिवाराचे अनेक व्यवसाय आणि दुकाने आहेत. जी मुलेमुली या घरात जन्मले, वाढले, त्यांना हा मोठा परिवार आनंदाचा ठेवा वाटतो पण दुसऱ्या घरातून लग्न होऊन आलेल्या मुलीना सुरवातीला एव्हडा मोठा कबिला म्हणजे भीती वाटायची. पण घरातील सर्वांनी या परक्या घरातील मुलीना आपले मानून त्यांना सर्व ते सहकार्य केले असे या घरातील सुना सांगतात.

या घरातील मुलांना खेळण्यासाठी, अभ्यासासाठी बाहेरच्या मित्रांची गरज कधीच भासलेली नाही कारण त्यांची ही गरज घरच्या घरी पूर्ण होते. खर्च कमी व्हावा म्हणून वर्षभर लागणारे तांदूळ, गहू, डाळी ठोक बाजारातून एकदम विकत घेतल्या जातात. करोना काळात घरातून कुणीही बाहेर पडले नाही आणि करोनाचे सर्व नियम कुटुंबीयांनी पाळले असे मोठ्या अभिमानाने घरातील व्यक्ती सांगतात.