द्रविड, रोहित आणि विराटने म्हणून सोडल्या विमानात बिझिनेस क्लास सीट

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२२ मध्ये टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज प्रचंड मेहनत करत आहेत. त्यांच्या या मेहनतीची कदर कोच राहुल द्रविड, सहकारी खेळाडूं विराट आणि रोहित यांनी ज्या पद्धतीने घेतली ते ऐकले कि कुणाही क्रिकेटप्रेमीची छाती नक्कीच अभिमानाने भरून येईल. मेलबर्न, एडलेड आणि सिडनी येथे टी २० सामने होत आहेत. त्यासाठी विमान प्रवास करावा लागतो आहे. राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आपल्या वेगवान गोलंदाजाना पूर्ण आराम मिळवा म्हणून त्याच्या बिझिनेस क्लासच्या सीट्स या गोलंदाजाना दिल्या आहेत.

ऑस्ट्रेलियातील पीच बाऊन्सी आहेत. त्यामुळे प्रत्येक टीम किमान तीन ते चार वेगवान गोलंदाज खेळवत आहे. टीम इंडिया याच रणनीतीने खेळत असून त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यात चार वेगवान गोलंदाज खेळवले आहेत. मोहम्मद शमी, अर्श्दीप सिंग, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या हे ते चार गोलंदाज आहेत.

सपोर्ट स्टाफ कडून मिळालेल्या माहितीनुसार स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच बिझिनेस क्लास सीट्स बदलण्याचा निर्णय घेतला गेला होता. वेगवान गोलंदाजाना अधिक कष्ट होत आहेत त्यामुळे त्यांच्या पायांना पुरेसा आराम मिळवा यासाठी पाय पसरून बसता येईल अशी जागा आवश्यक आहे. आयसीसीच्या नियमानुसार प्रत्येक टीम साठी चार बिझिनेस क्लास तिकिटे दिली जातात. कोच, कप्तान, उपकप्तान आणि प्रबंधक यांच्या साठी या सीट्स दिल्या जातात. यंदाच्या स्पर्धेत दर दोन तीन दिवसांनी प्रवास करावा लागत आहे.

टी २० स्पर्धा संपेपर्यंत टीम इंडिया ३४ हजार किमी प्रवास करणार असून हा प्रवास तीन टाईम झोन आणि विविध प्रकारच्या हवामानात करावा लागत आहे. सतत बदलत्या हवामानामुळे गोलंदाज जखमी होण्याचा धोका वाढतो हे लक्षात घेऊनच द्रविड, कोहली आणि रोहित आपल्या गोलंदाजांची विशेष काळजी घेत आहेत.