हे आहे ब्रिटन पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या फिटनेसचे रहस्य

युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान पदावर आरूढ होणारे ऋषी सुनक एकमेव आणि पहिले भारतवंशी म्हणून त्यांच्याविषयी चर्चा सुरु आहेच पण ऋषी सुनक चर्चेत राहण्याचे हे एकमेव कारण मात्र नाही. त्यांची लाईफस्टाईल आणि फिटनेस सुद्धा नेहमी चर्चेत राहिली आहे. ४२ वर्षाचे सुनक सर्वात कमी वयाचे पंतप्रधान आहेतच पण बॉडी फिटनेस मध्ये अव्वल असलेल्या राजकीय नेत्यांच्या मध्ये त्यांची गणना होते. अर्थात त्यामागे त्यांचे परिश्रम आणि काटेखोर दिनचर्या कारणीभूत आहे.

‘द २० मिनिट व्हीसी पॉडकास्ट विथ हॅरी स्टीबिन्ग्ज’ या कार्यक्रमात २०२१ मध्ये सुनक सहभागी झाले होते तेव्हा त्यांनी त्यांची दिनचर्या आणि आहार याबाबत सांगितले होते. सकाळी सहा च्या दरम्यान त्याचा दिवस सुरु होतो. आरोग्यपूर्ण न्याहारी घेऊन ते जिम मध्ये जोरदार व्यायाम करतात. अमेरिकन फिटनेस प्रशिक्षक कोडी रिग्जबी यांचे व्यायाम प्रकार ते फॉलो करतात. अधून मधून न्याहारी न घेणे, थोड्या थोड्या वेळाने थोडा थोडा आहार घेणे, न्याहारी मध्ये ग्रीक योगर्ट, ब्लू बेरी घेण्याकडे त्यांचा कल आहे. मात्र विकेंडला ते पूर्ण शिजवलेले पदार्थ म्हणजे वोफल्स, पॅनकेक शिवाय फळे घेतात. ते वेगन आहेत, म्हणजे प्राणीजन्य पदार्थ खात नाहीत.

ऋषी सुनक धार्मिक वृत्तीचे आहेत आणि भारतीय संस्कृती मधील सण ते भक्तीभावाने साजरे करतात. यामुळेच १० डाउनिंग स्ट्रीट मध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी घराबाहेर पणत्या लावल्या होत्या. विशेष म्हणजे त्या दिवशी दिवाळीतील लक्ष्मीपूजन होते.