… तर मंगळावर जाऊन सामना बघू


दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा अनुभव घेणं हे अनेकांसाठी रोमांचकारी असतं. फारुख इंजिनियर यांच्यासारखे दिग्गज खेळाडूही याला अपवाद नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट संघाचा सामना मंगळ किंवा कोणत्याही परग्रहावरील मैदानात झाला तरी आपण तो बघायला जाऊ, असे फारुख यांनी येथील खाजगी रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

टी २० विश्वचषक सामन्याचा थरार अनुभवायला फारुख दुबई येथे गेले आहेत. भारत आणि पाकिस्तान या संघातील सामने बघणे हा वेगळा आणि रोमांचकारी अनुभव असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट संघात सामन्यांची मालिका आयोजित करण्याचा प्रस्ताव इंग्लंड क्रिकेट व्यवस्थापनाने दिला आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना फारुख यांनी या दोन संघांचा खेळ बघण्याचा आनंद वेगळाच असल्याचे सांगितले.

फारुख यांनी रविवारी विराट कोहली याच्या ८२ धावांच्या विजयी खेळीचे कौतुक केले आहे. विराटने अनेक लक्षणीय खेळी खेळल्या आहेत. त्याच्या खेळाने नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे, असे फारुख यांनी नमूद केले. सध्याच्या भारतीय क्रिकेट संघात दिसून येणारा मैत्रभाव कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.