
नवी दिल्ली: समाज माध्यमांचे विविध मंच हे दहशतवादी गटांचे विघातक विचार पसरवणारे प्रभावी साधन बनले असल्याची टीका परराष्ट्र मंत्री एस जयशंकरन यांनी केली.
समाज माध्यमं हे दहशतवाद्यांचे ‘ टूल किट ‘
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने नियुक्त केलेल्या दहशतवाद विरोधी समितीच्या विशेष बैठकीत जय शंकरन यांनी नवं तंत्रज्ञान आणि दहशतवाद या संबंधी निर्माण झालेल्या आव्हानांची वस्तुस्थिती कथन केली.
समाज माध्यमांचे मंच हा दहशतवादी गटांचे टूल कीट बनला आहे. या मंचावरून दहशतवादी गट समाजात वितुष्ट निर्माण करणारी, समाजात दरी निर्माण करणारी आणि असंतोष निर्माण करणारी माहिती प्रसिद्ध करत आहेत, या कडे जय शंकरन यांनी लक्ष वेधले.
खाजगी आभासी नेटवर्क, एनक्रिप्टेड मेसेज सर्व्हिस, ब्लॉक चेन या नव्या तंत्राचा वापर दहशतवादी गट मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्याद्वारे आपल्या विचारांचा प्रसार, तरुणांना आपल्या विघातक विचारांकडे आकर्षित करणे आणि पैसा उभा करणे यासाठी करत आहेत, याकडे जय शंकरन यांनी लक्ष वेधले.
दहशतवादी गट आणि त्यांचे हितचिंतक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सद्भाव, स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि प्रगती यांना बाधा आणत आहेत, असे नमूद करताना जय शंकरन यांनी, संयुक्त राष्ट्रांकडून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना भारताकडून पूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.
