निवृत्तीनंतर काय करतात सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश

आपले सध्याचे सरन्यायाधीश उदय उमेश ललित येत्या ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. देशाचे ते ४९ वे सरन्यायाधीश असून त्यांच्या जागी ५० वे सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड येणार आहेत. ललित या पदावर येण्यापूर्वी प्रसिद्ध वकिल म्हणून नावाजले गेले होते. अनेकांना असा प्रश्न पडतो सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर हे लोक काय करत असतील?

आपला हा इतिहास पाहिला तर असे दिसून येते की निवृत्ती नंतर बहुतेकजण विविध क्षेत्रात कार्यरत राहिले आहेत. काही राजकारणात आले, काही विविध विद्यापीठांचे कुलगुरू बनले. निवृत्तीनंतर बहुतेक न्यायाधीश कुठल्या ना कुठल्या आयोगाचे अध्यक्ष नक्कीच बनतात तर काही या पैकी कुठल्याच भूमिकेत न जाता पूर्ण निवृत्ती घेतात. यातील अनेक न्यायाधीशांनी त्यांच्या कार्यकाळात आदर्श निर्माण केले आहेत.

२०१३-१४ या काळात सरन्यायाधीश असलेले सताशिवम केरळचे राज्यपाल बनले होते तर रंजन गोगोई यांना राज्यसभेसाठी नामांकन मिळाले होते. १९९८ ते २००४ या काळात, सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा राज्यसभेत गेले होते. के सुब्बाराव यांनी निवृत्तीला १० महिने बाकी असतानाच मार्च १९६६ मध्ये विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविली होती. त्यासाठी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. पण त्यांना झाकीर हुसेन यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. १९६८ ते ७० या काळात सरन्यायाधीश असलेले हिदातुल्लाह निवृत्ती नंतर ६ वे उपराष्ट्रपती बनले होते आणि काही काल त्यांनी राष्ट्रपती पदाची हंगामी जबाबदारी सुद्धा पार पाडली होती.