टी २० वर्ल्ड कप, काही रोचक माहिती

टी २० वर्ल्ड कपची सुरवात ऑस्ट्रेलियात झाली आहे. टी २० च्या इतिहासात अनेक रेकॉर्ड नोंदविली गेली आहेत तर काही रेकॉर्ड अशीही आहेत जी या स्पर्धेसाठी शाप बनून राहिली आहेत. ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी २० वर्ल्ड कपचा हा आठवा सिझन आहे. त्यातील पहिल्या राउंडचे सामने सुरु झाले आहेत.

विशेष म्हणजे आजपर्यंत टी २० च्या इतिहासात घडलेले एक नवल म्हणजे यजमान देशाला या स्पर्धेत विजयी होता आलेले नाही. म्हणजे ज्या देशातून वेळो वेळी हे सामने झाले त्या त्या देशाला त्या वर्षात हा कप जिंकता आलेला नाही. आता यंदा ऑस्ट्रेलिया हे रेकॉर्ड तोडेल का या बाबत उत्सुकता आहे. आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका, बांग्ला देश, भारत आणि युएई /ओमान येथे टी २० वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या आहेत. विशेष म्हणजे  ही स्पर्धा दोन वेळा जिंकणारी टीम आहे वेस्ट इंडीज. २०१२ आणि २०१६ अश्या दोन वेळा वेस्ट इंडीजने हा कप जिंकला आहे.

या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर भारताचा रवीचंद्रन अश्विन हा आहे. त्याने २६ विकेट घेतल्या आहेत.तर सर्वोच्च धावांचे रेकॉर्ड श्रीलंकेच्या नावावर आहे. त्यांनी २००७ मध्ये केनिया विरुद्ध ६ विकेटवर २६० धावा काढल्या होत्या. गेली १५ वर्षे हे रेकॉर्ड कायम आहे. क्रिस गेल हा सर्वाधिक छक्के मारणारा फलंदाज आहे. त्याने २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्ध ११ छक्के मारले होते आणि पूर्ण स्पर्धेत ६३ छक्के लगावले होते. या स्पर्धेत पहिली हॅट्रीक ब्रेट ली याने घेतली होती.२००७ मध्ये बांग्ला देशाविरुद्ध त्याने ही कामगिरी केली आहे.

टी २० च्या इतिहासात निचांकी स्कोअर करण्याचे रेकॉर्ड नेदरलंडच्या नावावर आहे. त्यांनी २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ऑल आउट ३९ धावा केल्या होत्या. या स्पर्धेतील ‘बॉल आउट’नियमानुसार फक्त एक सामना झाला आणि तो भारत पाकिस्तान यांच्यात झाला. २००७ मध्ये भारत पाकिस्तान मध्ये २० ओवर सामना बरोबरीत झाल्यावर बॉल आउट नियमानुसार भारताला विजयी घोषित केले गेले पण पुढच्या वर्षीपासून हा नियम रद्द करण्यात आला. त्याची जागा आता सुपर ओव्हरने घेतली आहे.