भारतात ४ जी स्मार्टफोन उत्पादन बंद करणार कंपन्या

मोबाईल उत्पादक कंपन्यानी बुधवारी भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत १० हजार वा त्या पुढच्या किमतीचे ४ जी स्मार्टफोन मोबाईल उत्पादन बंद करण्याच्या निर्णयाला पाठींबा दिला असून १० हजार व त्यापेक्षा अधिक किमतीचे ५ जी स्मार्टफोन उत्पादन करण्याची तयारी दाखविली आहे. दूरसंचार विभाग व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे  मोबाईल ऑपरेटर व मोबाईल उत्पादक यांना ३ महिन्यानंतर फाईव्ह जी वर शिफ्ट होण्याचे आदेश दिले गेल्याचेही सांगितले जात आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या देशात ७५ कोटी स्मार्टफोन युजर्स आहेत. त्यातील १० कोटी युजर्स फाईव्ह जीचा वापर करत आहेत मात्र ३५ कोटी हून अधिक युजर्स थ्री जी, फोर जी स्मार्टफोन वापरत आहेत. सर्व मोबाईल उत्पादक यापुढे १० हजारापेक्षा जास्त किमतीच्या फोन मध्ये फोर जी किंवा त्यापेक्षा कमीचे कनेक्शन यापुढे देणार नाहीत. या बैठकीत टॉप उत्पादक अॅपल, सॅमसंग सह अन्य टेलिफोन ऑपरेटर्स सहभागी झाले होते. फाईव्ह जी सेवा सहज आणि सुरळीत होण्यासाठी हे अपडेट करणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

भारती एअरटेल आणि रिलायंस जिओने देशातील काही शहरात १ ऑक्टोबर पासून फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे. मात्र अनेक युजर्सकडून फाईव्ह जी वापरल्यावर डेटा काही सेकंदात संपत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. फाईव्ह जी चा स्पीड ५०० ते ६०० एमबीपीएस असल्याचे केलेल्या चाचण्यात दिसून आले आहे. जिओ अनलिमिटेड डेटा देत आहे आणि भारती सध्या गेल्यावेळच्या प्लॅन मध्येच फाईव्ह जी सेवा देत आहे.