पालघर साधू हत्या प्रकरण सीबीआयकडे देणार, सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचे उत्तर


मुंबई : 2020 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील साधूंच्या निर्घृण हत्येचा तपास आता महाराष्ट्र सरकार सीबीआयकडे सोपवणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात एका उत्तरादरम्यान ही माहिती दिली आहे. या घटनेपासून भाजपचे नेते या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी सातत्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे करत होते. मात्र, त्या काळात या मागणीकडे एमव्हीए सरकारने दुर्लक्ष केले. याप्रश्नी मंत्रालयासमोर ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले. आता या प्रकरणाबाबत भाजपच्या धार्मिक सेलचे नेते आचार्य तुषार भोसले म्हणाले की, जे काम ठाकरे सरकारने केले नाही, ते काम हिंदु धर्म रक्षक देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

तुषार भोसले म्हणाले की, पालघर साधू हत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माबाबत किती जागरूक आहेत. हे आज हिंदूंना दाखवून दिले आहे. नाहीतर हिंदूंची दुकानदारी भोगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांची काय अवस्था आहे? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम म्हणाले की, आता महाराष्ट्राचे शिंदे-फडणवीस सरकार पालघरच्या साधूंच्या कुटुंबीयांना न्याय देईल.

याप्रकरणी स्वामी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज म्हणाले की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने पालघरच्या संतांच्या निर्घृण हत्येची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जे काम केंद्र सरकारने केले नाही ते सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. ते म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास नकार दिला होता. मात्र, आता या पालघर प्रकरणात जीव गमावलेल्या संतांना न्याय मिळणार आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचेही आभार मानले आहेत.

काय आहे पालघर हत्याकांड?
16 एप्रिल रोजी जुना आखाड्यातील चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70), त्यांचे सहाय्यक सुशीलगिरी महाराज (35) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (30) यांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली होती. जमावात सुमारे 500 लोकांचा समावेश होता. जमावाने पोलिसांवरही हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आणि साधूंना दगडाने मारहाण करण्यात आली.