मुलायमसिंग यांची प्रेमकथा, पत्नी गेली तेथेच घेतला शेवटचा श्वास

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग याचे वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रेमकथेची चर्चा सुरु झाली आहे. मुलायम यांच्या द्वितीय पत्नी साधना गुप्ता यांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. साधना गुप्ता मेदांता मध्ये उपचार घेत असतानाच त्यांचे निधन झाले होते आणि विशेष म्हणजे पत्नीने जेथे शेवटचा श्वास घेतला तेथेच मुलायम यांनीही शेवटचा श्वास घ्यावा हा त्यांच्या प्रेमाची साक्ष देणारा मानला जात आहे.

मुलायम आणि साधना गुप्ता यांची प्रेमकथा फिल्मी म्हणावी अशी आहे. मुलायम यांचे पुत्र अखिलेश यांनी त्यांच्या ‘ बदलाव कि लहर’ या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. मुलायम यांच्या मातोश्री मूर्तीदेवी आजारी होत्या तेव्हा साधना त्यांची काळजी घेत असत. एकदा नर्स मूर्तीदेवीना चुकीचे इंजेक्शन देत होत्या तेव्हा साधना यांनीच नर्सला थांबविले आणि त्यामुळे मूर्तीदेवी वाचल्या.मुलायम यांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्यावर साधना यांचा प्रभाव पडला. साधना तेव्हा समाजवादी पक्षाच्या सदस्य होत्या. मुलायम यांच्या पहिल्या पत्नी जिवंत असतानाच या दोघांच्या मध्ये प्रेमसंबंध जुळले आणि हे प्रेम दिवसेदिवस अधिक गहिरे होत गेले.

विशेष म्हणजे साधना यांचा पहिला विवाह झाला होता आणि पहिल्या पतीपासून त्यांना झालेल्या प्रतिक या मुलाला मुलायम यांनी २००३ पासून स्वतःचे नाव दिले होते. प्रथम पत्नी मालतीदेवी यांचे निधन झाल्यावर मुलायम यांनी साधना यांना पत्नीचा दर्जा दिला. हे दोघे राजकीय कामात किंवा पक्षासाठीचे दौरे, प्रवास एकत्र करत असत. अर्थात दोघानाही या प्रेमासाठी अनेक तडजोडी कराव्या लागल्या. अखिलेश या विवाहावर नाराज होते आणि त्यांनी नेहमीच साधना यांच्याकडे सावत्र आई म्हणून पहिले. पण कुटुंबातील शांती कायम राहावी यासाठी साधना यांनी राजकारणातले पाउल मागे घेतले आणि मुलगा प्रतिक यालाही राजकारणापासून दूर ठेवले. अखिलेश यादव यांच्याकडे त्यांनी नेहमीच मोठा मुलगा म्हणून पाहिले असेही सांगितले जाते.