महानायकाचे सहस्त्रचंद्र दर्शन,८० वर्षाचे झाले अमिताभ

बॉलीवूडचा शतकाचा महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा जन्मदिवस असून त्यांचा हा सहत्रचंद्र दर्शन सोहळा मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. व्यावसायिक जीवनात अतिशय बिझी असलेले अमिताभ एक चांगले ‘फॅमिली मॅन’ आहेत. इतक्या बिझी दिनचर्येत सुद्धा ते आपल्या परिवारासाठी वेळ देतात. त्यांच्या मनात परीवाराला जास्त महत्व आहे. जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असलेला हा नायक सर्वसामान्य जनतेशी सुद्धा तितकाच जोडलेला आहे. अमिताभ यांच्या सोशल अकौंटवर नजर टाकली तर हा नायक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या अगदी जवळचा आहे हे सहज लक्षात येते.

जया भादुरी आणि अमिताभ बच्चन याच्या विवाहाला ४९ वर्षे झाली आहेत. ३ जून १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ उतार आले, अनेकदा नाते तुटण्याच्या पायरीवर पोहोचले पण दोघांनीही हे नाते सांभाळण्याचे कसोशीने प्रयत्न केले. यामुळेच त्यांना बॉलीवूडमधील ‘पॉवर कपल’ म्हटले जाते. अमिताभ वेळोवेळी पत्नी जया यांचे कौतुक करतात, दोघांच्या जीवनातील अनेक प्रसंग, फोटो चाहत्यांशी शेअर करत असतात. मुलगा अभिषेक माझा वारसा पुढे नेईल हे सांगताना मुलगी श्वेता माझ्या घराचा अभिमान आणि सन्मान आहे असेही सांगतात.

सून ऐश्वर्या आणि अमिताभ यांचे नाते तर आणखीच जिव्हाळ्याचे असून ते ऐश्वर्याला मुलगीच मानतात आणि ती अमिताभना वडील मानते. ते दोघेही आपली सुख दुखे शेअर करतात असे सांगितले जाते. नात आराध्या, नव्या नवेली आणि नातू अगस्त्य यांच्या साठी बिगबी यांच्याकडे नेहमीच वेळ असतो. इतकेच नव्हे तर ते नातवंडासोबत वेळ घालविण्याची संधी शोधत असतात, सोशल मिडीयावर नातवंडासोबतचे अनेक फोटो ते वेळोवेळी पोस्ट करतात.असा हा फॅमिली मॅन शतायुषी होवो अश्या शुभेछ्या.