हा देश ५ लाख विमान तिकिटे देणार मोफत

हॉंगकॉंग सरकारने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ५ लाख विमान तिकिटे मोफत देण्याची घोषणा केली आहे. हॉंगकॉंग हा पर्यटकांसाठी अतिशय आवडते स्थळ असलेला देश आहे. मात्र करोना मुळे येथील पर्यटन व्यवसाय अतिशय डबघाईला आला असून फार मोठे नुकसान या उद्योगाला सोसावे लागले आहे. पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी येथील सरकारने विमान कंपन्याच्या कडून २१ अब्ज रुपये किमतीची ५ लाख विमान तिकिटे खरेदी करून ठेवली होती. २०२० मध्येच दिलासा योजनेखाली ही तिकिटे खरेदी केली गेली होती.

सरकारच्या या योजनेमुळे विमान कंपन्याची आर्थिक स्थिती थोडीफार सुधारण्यास हातभार लागला होता. करोना पूर्वी या बेटाला ५६ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. पण करोनाची दोन वर्षे आणि चीनच्या झिरो कोविड पॉलिसीमुळे वारंवार लादली गेलेली अनेक बंधने यामुळे पर्यटन व्यवसाय डबघाईला आला. त्यातून थोडे उभरण्यासाठी हॉंगकॉंगने २१ दिवसाचा प्रवाशांसाठी लागू असलेला क्वारंटाईन पिरीयड घटवून आठ दिवसांवर आणला होता मात्र तो फक्त हॉंगकॉंग स्थानिक प्रवाशांसाठी होता आणि त्यांना स्वखर्चाने राहावे लागत होते. यामुळे म्हणावे त्या संखेने पर्यटक येत नव्हते.

सरकारने खरेदी केलेली विमान तिकिटे पुढच्या वर्षात पर्यटकांना मोफत दिली जाणार असून त्यासाठीची योजना बनविण्याचे काम सुरु झाले असल्याचे सांगितले जात आहे.