अटारी वाघा बॉर्डरवर फडकणार ४१८ फुट उंचीचा तिरंगा

देशात सर्वाधिक उंचीचा तिरंगा भारत पाक सीमेवरील अटारी वाघा बॉर्डर येथे उभारला जात असून हा तिरंगा ४१८ फुट उंचीचा असेल. सध्या या बॉर्डरवर ३६० फुट उंचीचा तिरंगा आहे आणि २०१७ मध्ये साडेतीन कोटी रुपये खर्च करून वाघा चेकपोस्टवर हा तिरंगा उभारला गेला होता. पण त्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या बाजूला ४०० फुट उंचीचा त्यांचा ध्वज उभा केला होता. आता त्याला उत्तर देताना या ध्वजापेक्षा १८ फुट अधिक उंचीचा तिरंगा येथे फडकाविला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या तिरंगा योजनेची तयारी करत आहे.

एनएचएआयचे अधिकारी म्हणाले, तिरंगा उभा करण्याची जागा अजून निश्चित झालेली नाही. पण बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त चेक पोस्ट प्रेक्षक गॅलरी जवळ हा तिरंगा फडकेल. त्यासाठीच्या टेंडरला मंजुरी मिळाली असून एक महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल. संयुक्त चेक पोस्ट गॅलरी इमारत उंच असल्याने बिटिंग रिट्रीट समारोहात येणाऱ्या भारतीयांना तिरंगा व्यवस्थित दिसत नाही अशी तक्रार होती आणि तिरंग्याची उंची वाढवावी अशी मागणी होत होती. देश विदेशातील पर्यटक येथे नित्य येतात. ही सीमा आणि तेथील उंच तिरंगा हे त्यांचे मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे येथे सौंदर्यीकरणाचे काम सुद्धा सुरु केले गेले आहे.

सध्या देशातील सर्वात उंच तिरंगा बेळगावी येथे बेळगावी किल्ल्यात असून त्याची उंची ३६० फुट आहे. देशातील तिसरा उंच तिरंगा गुवाहाटी येथील पहाडावर असून त्याची उंची ३३० फुट आहे. कोल्हापूर पोलीस मुख्यालयात ३०३ फुट उंचीचा तिरंगा आहे तर देशातील पाचवा उंच तिरंगा रांची पहाड मंदिरावर असून तो २९३ फुट उंचीचा आहे.