या गावात झाला होता लंकेशाधिपती रावणाचा जन्म

उत्तरप्रदेशातील गौतम बुद्ध नगर पासून काही अंतरावर असलेले  बिसरख हे गाव भारतातील असे एक ठिकाण आहे जेथे दसऱ्याला रावण दहन केले जात नाही. देशभरात दसऱ्याला उत्साहात रामलीला आणि रावण दहन जागोजागी होत असते तेव्हा बिसरख मध्ये मात्र शोक पाळला जातो. कारण लंकाधीपती रावण याच गावात जन्माला आला होता असे मानले जाते. त्यामुळे रावण या गावाचा सुपुत्र आहे. रावणाचे भाऊ कुंभकर्ण, बिभीषण आणि बहिण शूर्पणखा यांचे जन्म सुद्धा याच गावात झाले होते असे मानतात.

या गावात दोन वेळा रामलीला आणि रावण दहन कार्यक्रम झाले पण त्या दोन्ही वेळी गावात अचानक मृत्यू झाले आणि शांती साठी हवन केले गेले असे सांगतात. येथे नवरात्रात शिवलिंगाला बळी चढविला जातो.

असे सांगतात की रावणाचे पिता विश्रवा ऋषी होते. त्यांच्यावरूनच या गावाला बिसरख नाव पडले. हे ऋषी येथे रोज पूजा करत असत. पूर्ण भारतात हे एकच असे ठिकाण आहे जेथे अष्टभूजीय शिवलिंग आहे. रावणाचे शिक्षण याच गावात झाले, हिंडन नदीच्या उगमावर येथे दुधेश्वरनाथ मंदिर असून त्याची स्थापना रावणानेच केली असे मानतात. रावण या गावाच्या सुपुत्र आणि येथील देवता ही आहे.