फुलराणी पीव्ही सिंधूने गरबा नृत्यात दाखविले नैपुण्य

भारताची स्टार बॅडमिंटन पटू, ऑलिम्पिक विजेती पीव्ही सिंधू हिचे मैदानावरचे पदलालित्य अनेकांनी पहिले आहेच. पण यंदा तिने गरबा नृत्यात सुद्धा आपण तितकेच प्रवीण आहोत याचा परिचय करून दिला आहे. सुरत आणि अहमदाबाद येथील गरब्यात सिंधू ने गरबा खेळून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. नवरात्राचा आज शेवटचा दिवस. गेले नऊ दिवस गुजराथ गरबा आणि दांडियामय झाला आहे. गुजराथच्या गरब्याची भव्यता आणि सौंदर्य जगभरात विख्यात आहे. यंदा गुजराथ मध्ये याच काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असून गरबा आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असा मणीकांचन योग जुळून आला आहे.

अनेक भारतीय खेळाडू आणि अॅथलेटनी गुजराथ मध्ये गरबा एन्जॉय केला. सिंधूने सुद्धा पारंपारिक गरबा पोशाख घालून याचा आनंद लुटला. २७ वर्षीय सिंधूचे नृत्याबद्दल खूप कौतुक झाले. तिच्या बरोबर लांब उडी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज, माजी बॅडमिंटनपटू तृप्ती मुर्गुडे यासुद्धा गरबा खेळात सामील झाल्या. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने इन्स्टाग्रामवर याचे व्हिडीओ लोड केले आहेत.

१ ऑक्टोबरला सिंधूने सुरत येथे बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन केले. २९ सप्टेंबरच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उद्घाटनाला ती हजर होती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले आणि नीरज चोप्रा, बजरंग पुनिया, मीराबाई चानू सुद्धा त्यावेळी उपस्थित होते. या सर्व खेळाडूंनी विविध ठिकाणी अहमदाबाद मध्ये गरबा खेळल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातून जमलेल्या खेळाडूंना गुजराथी संस्कृतीची ओळख करून दिली जात आहे. सुरत मधील मॅरियट हॉटेल मध्ये पीव्ही सिंधूने गुजराथी भोजनाचा आनंद घेतला असून प्रथमच २० पेक्षा जास्त पदार्थ एकाचवेळी खाल्ल्याचे नमूद केले.