मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, आता बांधता येणार जॉगिंग ट्रॅक आणि उद्याने


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मुंबईच्या कोस्टल रोडच्या बांधकामातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. वास्तविक, पर्यावरणाच्या मुद्द्यावर कोस्टल रोडशी संबंधित रस्ते बांधकाम आणि इतर सुविधांच्या बांधकामाला विरोध करणारी याचिका एका एनजीओने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळून लावल्या आहेत. यानंतर महानगरपालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हा निर्णय अतिशय उत्साहवर्धक असल्याचे म्हटले आहे.

महापालिका आयुक्तांनी केले सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे स्वागत
बीएमसीचे आयुक्त इक्बाल चहल म्हणाले, माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कोस्टल रोड प्रकरणात दिलेला अतिशय उत्साहवर्धक आदेश… आम्हाला लँडस्केपिंग आणि भूमिगत पार्किंगची कामे करण्यास मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत वेळापत्रक पूर्ण होईल, असे महानगरपालिकेने शेड्यूल केले आहे.

रस्ता तयार झाल्यानंतर आता निर्माण होणार आहेत सर्व सोयीसुविधा
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मुंबईतील हाजी अलीजवळ भूमिगत पार्किंग, सायकल आणि जॉगिंग ट्रॅक, ओपन स्पेस गार्डन, समुद्रकिनारी रिसॉर्ट आणि बटरफ्लाय पार्क उभारता येणार आहे. केवळ मनोरंजन पार्क बांधता येणार नाही. रस्तेबांधणीबरोबरच आता या सुविधांच्या उभारणीतील अडथळाही दूर झाला आहे. त्याचवेळी, कोस्टल रोड प्रकल्प 14 हजार कोटी रुपयांचा असून तो नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे.

कोस्टल रोड बनल्याने काय होतील फायदे
मुंबईतील कोस्टल रोडचे बांधकाम झाल्यानंतर वाहतूककोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय मुंबईकरांना सुरक्षित, जलद आणि आर्थिकदृष्ट्या प्रवास करता येणार आहे. यासोबतच रुग्णवाहिकेचा प्रवासही जलद होणार आहे. कोरोना संकटामुळे कोस्टल रोड प्रकल्पाची गती मंदावली होती, मात्र आता या प्रकल्पाच्या कामाला चांगली गती मिळाली असून आतापर्यंत 58 टक्के काम पूर्ण झाले आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

  • मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  • प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून वांद्रे-वरळी सी लिंकच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत एकूण 10.58 किमी लांबीचा प्रकल्प उभारला जात आहे.
  • या प्रकल्पामध्ये 4+4 लेनचे तटबंधी रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.
  • कोस्टल रोड प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात ऑक्टोबर, 2018 मध्ये सुरू झाले आणि नोव्हेंबर, 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
  • या प्रकल्पामुळे रस्त्यावरील प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार असून सध्याच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
  • एवढेच नाही तर हवा आणि ध्वनी प्रदूषणाची पातळीही कमी होईल.
  • यासोबतच समर्पित बस मार्गांद्वारे सार्वजनिक वाहतूक सुधारून अतिरिक्त हरित पट्टाही निर्माण केला जाईल.
  • संपूर्ण प्रकल्प तीन पॅकेजमध्ये विभागलेला आहे.