स्वीडनच्या कार्ल गुस्ताफ एम 4 रायफल्स ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बनणार

स्वीडनची कंपनी साब भारतात त्यांच्या बहुचर्चित रायफल्सचे उत्पादन ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत करणार आहे. या संदर्भातली घोषणा कंपनीने २७ सप्टेंबर रोजी केली आहे. त्यात कंपनीला उत्पादन वाढायचे असल्याने भारतात उत्पादन करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे हे शस्त्र स्वीडन बाहेर फक्त भारतातच बनविले जाणार आहे. भारतात हा उत्पादन प्रकल्प २०२४ मध्ये सुरु होत असून तेव्हाच उत्पादनाची सुरवात होणार आहे. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गोर्गेन जोहान्सन म्हणाले या प्रकल्पात फक्त शस्त्रेच नाही तर जगात वापर असलेल्या अन्य शस्त्रासाठी आवश्यक उपकरणे सुद्धा बनविली जातील.

कार्ल गुस्ताफ रायफल्सचा वापर भारतीय सेना १९७६ पासून करत आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या प्रत्येक आघाडीवर जवान कार्ल गुस्ताफ एम २, एम ३ वापरत आहेत. गेल्या काही वर्षात जगभरात या रायफल्स संदर्भात अधिक रस घेतला जात असून रशिया युक्रेन युद्धापासून या रायफल्सची मागणी वाढली आहे. एम १, एम २, एम ३ आणि एम ४ अश्या चार प्रकारच्या या रायफल्स अनुक्रमे १९४६,१९६४,१९८६ आणि २०१४ पासून वापरात आहेत.

खांद्यावर ठेऊन फायर करण्याच्या या रायफलची रेंज दीड किलोमीटरची आहे. बुलेटप्रुफ वाहनांना सुद्धा यातून टार्गेट करता येते आणि या रायफल्स अचूक निशाणा साधणाऱ्या आहेत. यात सैनिक सुरक्षेची विशेष काळजी घेतली गेली असून फिंगरप्रिंट टेक्नोलॉजी वापरली गेली आहे. ही रायफल ३७ इंच लांब आणि ६.६ किलो वजनाची आहे. त्यासाठी दोन सैनिक लागतात. एक गनर आणि दुसरा लोडर. या रायफलीतून एक मिनिटात ६ राउंड फायर केले जातात आणि शत्रूवर प्रती सेकंद ८४० फुट वेगाने हल्ला होतो.

भारतातील कारखान्यात भारतीय हवाई दलासाठी वेपन सिस्टीम सुद्धा बनविली जाणार आहे. साबची उपकंपनी एफएफव्ही इंडिया प्रा.लिमिटेड येथे हे उत्पादन केले जाणार आहे.