IND vs SA : सूर्यकुमार यादवने मोडला धवनचा विक्रम, एका कॅलेंडर वर्षात केल्या सर्वाधिक T20I धावा


टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 107 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून सामना जिंकला. टीम इंडियासाठी सूर्यकुमार यादवने दमदार खेळी केली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर सूर्यकुमारने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. तो एका कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यादरम्यान त्याने केवळ 33 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. या खेळीत सूर्यकुमारने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीच्या जोरावर त्याने शिखर धवनला मागे टाकले. एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धवनच्या नावावर होता. आता सूर्यकुमार अव्वल स्थानी पोहोचला आहे.

सूर्यकुमारने या वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 695 धावा केल्या आहेत. तर धवनने 2018 मध्ये 689 धावा केल्या होत्या. या बाबतीत माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने 2016 मध्ये 641 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. रोहितने 2018 मध्ये 590 धावा केल्या होत्या.

भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० धावा –

  • 695 – सूर्यकुमार यादव (2022)*
  • 689 – शिखर धवन (2018)
  • 641 – विराट कोहली (2016)
  • 590 – रोहित शर्मा (2018)